प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हा जरी बॉलिवूड चित्रपटांचा प्राथमिक हेतू असला तरीही या चित्रपटांच्या माधमातून इतरही बऱ्याच गोष्टी साध होतात. त्यातीलच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भटकंती. कथानक कोणतंही असो, बर्फाच्छादित पर्वतरांगा, परदेशातील राहणीमान, सातासमुद्रापार असणारा निसर्ग, एका वेगळ्या देशातील वेगळी संस्कृती या साऱ्याचा दिग्दर्शकाला असणारा मोह हा चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जातो आणि पाहता पाहता प्रेक्षकही या गोष्टींवर भाळतात.

चित्रपटांच्या माध्यमातून देशोदेशीची सफर चाहत्यांना होते खरी पण, त्यातूनच त्या ठिकाणांना भेट देण्याची इच्छाही काही प्रवासवेड्या मंडळींच्या मनात निर्माण होते. काश्मिरपासून ते स्वित्झर्लंडपर्यंत आणि न्यूयॉर्कपासून बालीपर्यंत विविध ठिकाणांची झलक पाहून अनेक फिरस्त्यांनी त्यांची बकेट लिस्ट बदलत त्यामध्ये काही नव्या ठिकाणांची नावं जोडली. चला तर मग नजर टाकूया अशाच काही ठिकाणांवर..

वाचा : प्रवासखर्च कमी करण्याच्या सोप्या टिप्स

स्पेन-
‘झिंदगी मिलेगी ना दोबारा’ या चित्रपटातून कबीर, अर्जुन आणि इमरान या मित्रांच्या ब्रोमॅनिसला एका धमाल आणि तितक्याच प्र्भावी दृष्टीकोनातून दाखवण्यात आलं होतं. रस्त्याच्या कडेने धावणारे घोडे, बुल रेसिंग, समुद्रकिनारे आणि चिंचोळ्या वाटांचा हा देश सध्या अनेकांच्याच विशलिस्टमध्ये अग्रस्थानी आहे.

सिडनी-
‘दिल चाहता है’ या चित्रपटाच्या निमित्ताने सिडनीची झलक प्रेक्षकांना मिळाली. अर्थात हा चित्रपट तसा बऱ्यापैकी जुना असला तरीही एव्हरग्रीन चित्रपटांच्या यादीत तो अग्रस्थानी असल्यामुळे हे उदाहरण सार्थ ठरत आहे. सिडनीचं विहंगम दृश्य या चित्रपटातून पाहायला मिळालं, ज्यामुळे सिडनी इज मस्ट म्हणणाऱ्यांची संख्या वाढली आहे, असं म्हणायला हरकत नाही.

प्राग-
रणबीर कपूरचा रॉकस्टार होण्यापर्यंतचा प्रवास प्रागशिवाय पूर्ण होत नाही. त्याचप्रमाणे अनेक प्रवासवेड्या मंडळींची भटकंतीची यादीही या ठिकाणाला भेट दिल्याशिवाय पूर्ण होत नाही. इथे असणारे महाल आणि ऐतिहासिक वास्तू पर्यटकांच्या विशेष आवडीचे.

इस्तानबुल-
अनिल कपूर, प्रियांका चोप्रा, रणवीर सिंग यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणारा ‘दिल धडकने दो’ हा चित्रपट आठवतोय का?या चित्रपटाचं कथानक फिरणाऱ्या मेहरा कुटुंबाच्या एका वेगळ्या प्रवासाने प्रेक्षकांचं मन जिंकलं. ज्यामध्ये इस्तानबुल अतिशय महत्त्वाचं ठरलं. मुळात इस्तानबुलमध्ये मेहरा कुटुंबियांची क्रुझ थांबली नसती तर, चित्रपटाचं कथानकच पुढे गेलं नसतं हे खरं. पुरातन वास्तूंचा भरणा असणाऱ्या या ठिकाणी कुठेही उभं राहून फोटो काढला तर पिक्चर परफेक्ट, अशी एकच उस्त्फूर्त प्रतिक्रिया तुमच्या तोंडून बाहेर पडते.

कॉर्सिका-
रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्या मुख्य भूमिका असणारा ‘तमाशा’ हा चित्रपट अनेकांना भावला नसला तरीही त्यातून दाखवण्यात आलेलं कॉर्सिका मात्र सर्वांच्याच मनात घर करुन गेलं. रणबीर आणि दीपिकाप्रमाणे आपणही कधीतरी अशा अनोळखी ठिकाणी जाऊन ‘मटरगश्ती’ करावी असं म्हणणाऱ्यांची संख्याही कमी नाही.
या काही निवडक ठिकाणांशिवाय इतरही बरीच ठिकाणं चित्रपटांच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहता आली. विविध ठिकाणच्या संस्कृतीचं दर्शन झालं. तुम्हाला असा कोणता चित्रपट किंवा त्या निमित्ताने कोणतं ठिकाण आठवतंय का? आठवत असल्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा.