देशात गेल्या काही वर्षांमध्ये अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरांची उपलब्धता वाढली असल्याचे नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय आरोग्य अहवाल-२०१५’मध्ये नमूद करण्यात आले आहे. सेंट्रल ब्युरो ऑफ हेल्थ इंटेलिजन्सने बनवलेला हा अहवाल केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी नुकताच जाहीर केला. त्यानुसार देशात सध्या ९.३८ लाख अ‍ॅलोपॅथी डॉक्टर आहेत.

या अहवालानुसार २०१४ मध्ये ‘भारतीय वैद्यकीय समुपदेशन कायद्या’नुसार देशात अ‍ॅलोपॅथीची पदवी असलेले ९,३८,८६१ डॉक्टर आहेत. देशात गेल्या काही वर्षांत अ‍ॅलोपॅथीचे डॉक्टर, दंतवैद्य आणि परिचारिकांच्या संख्येत सातत्याने भर पडत आहे. देशात ३१ डिसेंबर २०१४ अखेर १,५४,४३६ नोंदणीकृत दंतवैद्य आहेत. सन २००७ पासून त्यांची संख्या सातत्याने वाढत गेली आहे.
त्याचबरोबर देशात नोंदणीकृत ‘आयुष’ डॉक्टरांची संख्या १ जानेवारी २०१४ रोजी ७,३६,५३८ असल्याचेही अहवालात नमूद केले आहे. देशातील आरोग्यसेवेची स्थिती जाणून घेऊन त्यानुसार धोरण ठरवण्यासाठी या अहवालाचा मोठा उपयोग होणार आहे. गेल्या २० वर्षांत देशातील आरोग्यविषयक सेवासुविधांचा झपाटय़ाने विस्तार होत आहे. देशात सध्या ३९८ वैद्यकीय महाविद्यालये, बीडीएस अभ्यासक्रम चालवणारी ३०५ महाविद्यालये, एमडीएस अभ्यासक्रम चालवणारी २२४ महाविद्यालये आहेत. त्यामध्ये २०१४-१५ मध्ये अनुक्रमे ४६,४५६, २६,२४० आणि ५,५०५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यासह देशात परिचारिका आणि सुईण यांचे प्रशिक्षण देणाऱ्या २८६५ संस्था असून त्यांची विद्यार्थी क्षमता १,१५,८४४ आहे, तसेच ७२३ फार्मसी महाविद्यालये असून त्यांची प्रवेश क्षमता ४३,३०० आहे.
देशात २०,३०६ रुग्णालये असून त्यामध्ये ६,७५,७७९ खाटांची व्यवस्था आहे. त्यापैकी १६,८१६ रुग्णालये ग्रामीण भागांत असून त्यामध्ये १,८३,६०२ खाटांची सोय आहे. ३,४९० रुग्णालये शहरी भागांत असून त्यात ४,९२,१७७ खाटांची सोय आहे, अशी माहिती या अहवालात नमूद केली आहे.

’ भारतात साडेनऊ लाख अ‍ॅलोपॅथी डॉक्टर
’ ‘राष्ट्रीय आरोग्य अहवाल-२०१५’मधील माहिती
’ आठ वर्षांत डॉक्टरांच्या संख्येत सातत्याने वाढ