पौष्टिक अन्नापासून वंचित राहिल्यामुळे पौगंडावस्थेतील मुलांमध्ये बळावणाऱ्या अ‍ॅनामिया (रक्ताक्षय) या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकार वैद्यकीय मोहीम आखणार आहे. या मोहिमेंतर्गत देशभरातील पौगंडावस्थेतील ११.२ कोटी मुलांना लोह आणि फॉलिक अ‍ॅसिड असलेल्या पौष्टिक अन्नपदार्थाचा पुरवठा करण्यात येणार आहे.
भारतामध्ये पौगंडावस्थेतील दोनपैकी एक मुलगी आणि तीनपैकी एक मुलगा अ‍ॅनामियाग्रस्त असतो. त्यासाठी केंद्र सरकारने ‘वीकली आयर्न अ‍ॅण्ड फॉलिक अ‍ॅसिड सप्लिमेन्शन’ (डब्ल्यूआयएफएस) नावाचा कार्यक्रम आखलेला आहे. या कार्यक्रमांतर्गत शाळा आणि अंगणवाडीतील मुलांना दर आठवडय़ाला ठरावीक दिवशी अ‍ॅनामिया नियंत्रक खुराक देण्यात येणार आहे. त्याशिवाय सकस आहाराविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला जाणार आहे. अ‍ॅनामिया या विकाराचे निदान आधुनिक पद्धतीने करण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहे. हा कार्यक्रम शिक्षण व एकत्रित बालविकास योजनेंतर्गत (आयसीडीएस) आखण्यात आला आहे.
अन्नापासून वंचित राहिल्यामुळे पौगंडावस्थेतच मुलांमध्ये बळावणाऱ्या अशक्तपणाच्या आजारापासून दूर ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारित लसीकरण मोहिमेचा शुभारंभ शुक्रवारी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते केला गेला. यानुसार देशातील ११.२ कोटी पौगंडावस्थेतील मुलांना शिसे आणि फोलिक अ‍ॅसिडयुक्त लस टोचण्यात येणार आहे.
‘‘भारत सरकार जगातील सर्वात मोठी मोहीम आखत असून ते आपले बलस्थान ठरणार आहे. मात्र या मोहिमेपुढे अनेक आव्हाने असून, जनजागृतीचीही गरज आहे. गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांमध्ये मोठय़ा प्रमाणात जनजागृती करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे,’’ असे केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी सांगितले. नड्डा यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे अनावरण करण्यात आले. या वेळी यूएनआयसीईएफची प्रसिद्धीदूत प्रियंका चोप्राही उपस्थित होती.
केंद्र सरकारने आयएफए केंद्रामधून पौगंडावस्थेतील मुलांना गोळ्यांऐवजी पौष्टिक अन्नपदार्थ पुरवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अन्नपदार्थाचा पुरवठा अ‍ॅनामियावर लढण्यासाठीचा महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यातूनच या समस्येचे निराकरण प्रभावीपणे होणे शक्य आहे. त्यासाठीच आम्ही औषध व अन्न आणि एफएसएसएआयसोबत आवश्यक गोळ्यांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आरोग्य सचिव बी. पी. शर्मा यांनी स्पष्ट केले.