कर्करोगाच्या पेशींकडून शरीरातील जैवकीय घडय़ाळात बदल घडवून आणले जातात, त्यामुळे कर्करोगाच्या पेशींमध्ये वाढ होते, तर सामान्य पेशींची संख्या कमी होते, असे नुकतेच एका संशोधनात स्पष्ट झाले आहे.

शरीरातील गाठीचा विस्तार करण्यासाठी कर्करोगाच्या पेशी न्यूक्लिअस अ‍ॅसिड आणि प्रथिनांचा अधिक वापर करतात. मात्र, अशा परिस्थितीत कर्करोगाच्या पेशींबरोबरच सामान्य पेशींचीही वाढ होते. या वेळी शरीरातील प्रथिनांची व्यवस्थित वाढ होत नाही. प्रथिनांची व्यवस्थित वाढ न झाल्यावर पेशी त्यांना कार्यरत करण्यास सुरुवात करतात. मात्र, त्यामुळे प्रथिने निर्मितीची प्रक्रिया आणखी संथ होते. त्यामुळे प्रथिने विषयुक्त बनतात आणि पेशींचा मृत्यू होतो. या परिस्थितीत टिकून राहण्यासाठी कर्करोगाच्या पेशी सामान्य पेशींना संपवून टाकतात. ही प्रक्रिया गाठीमध्ये निरंतर सुरू राहते, असे अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिनामधील वैद्यकीय विद्यापीठातील जे. अ‍ॅलन डायल यांनी सांगितले. संशोधकांनी याबाबतच्या शोधासाठी संथ प्रथिनांचा अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी रासायनिक प्रक्रिया केली.