केंद्र सरकारने एक ऑक्टोबर रोजी ग्राहकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी कन्झ्युमर अ‍ॅप(Consumer App)लॉन्च केलं आहे. या अ‍ॅपवर आलेल्या तक्रारींवरुन ऑनलाईन शॉपिंग साईट्स कंपन्यांच्या कारभारावर ग्राहक संतुष्ट नसल्याचं स्पष्ट होतंय. या अ‍ॅपवर आतापर्यंत आलेल्या तक्रारींपैकी 40 टक्के तक्रारी या एकट्या ई कॉमर्स व्यापाराशी निगडीत आहेत. या अ‍ॅपचं सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे यावर आलेल्या तक्रारींची माहिती थेट केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्यापर्यंत पोहोचते.

ई-कॉमर्सबाबत सर्वाधिक तक्रारी या सामानाच्या गुणवत्तेबाबत आहेत. शॉपिंग वेबसाईटवर दाखवलेली वस्तू आणि प्रत्यक्ष आलेल्या वस्तू यात असलेला फरक, सामानाची गॅरंटी आणि रिटर्नसंबंधी समस्या अशा अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्याचं समोर आलं आहे. या सरकारी अ‍ॅपवर आतापर्यंत एकूण 2217 तक्रारी आल्या असून 944 तक्रारींचं निवारण झालं आहे. यात आतापर्यंत ई-कॉमर्सबाबत 556 तक्रारी आल्या असून त्यातील 138 तकारींचं निवारण करण्यात आलं आहे, तर 418 तक्रारी प्रलंबित आहेत.

ई-कॉमर्सनंतर सर्वाधिक तक्रारी या बँकिंग क्षेत्राशी निगडित आहेत. आतापर्यंत बँकिंग क्षेत्रातील 196 तक्रारी सरकारच्या अॅपवर प्राप्त झाल्यात. यातील 78 तक्रारी सोडवण्यात आल्या असून 118 प्रलंबित आहेत. यानंतर टेलिकॉम क्षेत्राचा क्रमांक असून टेलिकॉम सेक्टरमधील 132 तक्रारी आल्या आहेत. यातील 51 तक्रारींच निवारण झालंय. त्याखालोखाल इलेक्ट्रॉनिक, वीज, ब्रॉडबँड आणि डिजिटल पेमेंट क्षेत्रांबाबतच्या तक्रारींचा समावेश आहे.