डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरणे हे आता अतिशय सामान्य झाले आहे. कोणत्याही व्यवहारांसाठी रोख रक्कम जवळ बाळगण्यापेक्षा अनेक जण कार्डद्वारे व्यवहार करणे पसंत करतात. मग वॉलेटमध्ये एकाहून एक वेगवेगळ्या कंपनीची कार्डे बाळगली जातात. मात्र आता असे करण्याची आवश्यकता नाही. कारण एका सरकारी बँकेनं नव्या तंत्रज्ञानाचं कार्ड ग्राहकांना उपलब्ध करून दिलं असून, एकाच कार्डमध्ये आपल्याला क्रेडिट आणि डेबिट या दोन्ही सुविधा मिळणार आहेत. आपल्या गरजेनुसार ग्राहकांना या कार्डचा वापर करता येणार आहे. या कार्डबरोबर ग्राहकांना आणखी एक विशेष सुविधा मिळाली आहे. कोणतीही रक्कम न भरता ग्राहकांना तब्बल २४ लाख रुपयांचा अपघात विमा मिळणार आहे.

युनियन बँक ऑफ इंडियानं ही अनोखी सुविधा सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वीच हे २ इन १ रुपे डेबिट आणि क्रेडिटची सुविधा देणारं कॉम्बो कार्ड ग्राहकांच्या सेवेत आणलं आहे. या डेबि कार्डद्वारे ग्राहकांना एकावेळी १ लाख रुपये काढता येणार आहेत. आता अचानक बँकेने ही सुविधा का दिली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर बँकेने आपल्या १०० व्या स्थापना दिनानिमित्त हे खास कार्ड लाँच केलं आहे. बँकेने आपल्या ट्विटर अकाऊंटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. ही दोन्ही कार्डे वापरण्यासाठी दोन वेगवेगळे पिन जनरेट करावे लागणार आहेत. कार्ड स्वाईप केल्यानंतर तुम्हाला कोणते कार्ड वापरायचे हे पिनद्वारे ठरवता येणार आहे. विशेष म्हणजे या ऑफरच्या माध्यमातून ग्राहकांना २४ लाख रुपयांचा अपघात विमाही मिळणार आहे.