अमेरिकेतील अभ्यासकांचा निष्कर्ष; वास्तुविशारदांसाठी अनुकूल रचनेचे आवाहन

मोकळ्या वातावरण भोजन केल्यास ते लाभदायी ठरते असा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला आहे. जेवताना आजूबाजूचे वातावरण कसे आहे यावर बरेच काही अवलंबून असते असे अमेरिकेच्या नोत्रदाम विद्यापीठातील सहप्राध्यापक किम रोलिंग्ज यांनी स्पष्ट केले.

रोलिंग्ज यांच्यासह कोर्नेल विद्यापीठातील नॅन्सी वेल्स यांनी ५७ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह या विषयाचा अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी स्वयंपाकघरात पडदे तसेच अडथळे उभे करून विविध प्रयोग केले. त्याचा निष्कर्ष खुल्या वातावरण जेवणे अधिक लाभदायक ठरते असा निघाला. खुल्या वातावरणात तसेच अधिक प्रकाशात अधिक जेवण जाते असे रोलिंग्ज यांनी सांगितले. बंदिस्त स्वयंपाकघरातील जेवणापेक्षा खुल्या वातावरणात जेवल्यास सर्वसाधारणपणे १७० कॅलरी अधिक मिळतात असा अनुभव असल्याचे रोलिंग यांनी सांगितले. खुल्या वातावरणात जेवायला बसल्यावर तुम्हाला पुन्हा पुन्हा अन्न घ्यावेसे वाटते हे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

या अभ्यासाचा निष्कर्ष वास्तुविशारदांसाठी महत्त्वाचा आहे. घरांबरोबरच, शाळा, महाविद्यालये तसेच कामांच्या ठिकाणी भोजनाच्या ठिकाणची रचना अशा पद्धतीने करायला हवी, असे रोलिंग्ज म्हणाल्या. अर्थात अशी खुल्या पद्धतीच्या स्वयंपाकगृहाच्या रचनेतून अधिक भोजन तुम्ही कराल पण तुमचा लठ्ठापणा मात्र वाढेल, तेव्हा त्याची काळजी घ्या, असे सांगायला त्या विसरल्या नाहीत. या अभ्यासाचे निष्कर्ष केवळ महाविद्यालये किंवा विद्यापीठांसाठीच नव्हे तर ज्यांना संतुलित आहाराची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या स्वयंपाकगृहाची रचना कशी ठेवायची हे आता ठरवावे.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)