कार्यालयामध्ये वरिष्ठांचे वागणे जर विचित्र आणि वाईट असेल तर ते इतर कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक आहे. सतत कर्मचाऱ्यांवर रागवणे, त्यांना घालूनपाडून बोलणे आणि आत्मस्तुती करून घेण्यास धन्यता मानणे असे वरिष्ठांचे वागणे असेल तर कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांना नैराश्यग्रस्त वाटू शकते तसेच ते कामाच्या ठिकाणी चुकीचे वर्तन करण्याची शक्यता असते.
संशोधकांच्या अभ्यासानुसार जे वरिष्ठ किंवा अधिकारी अशा प्रकारची लक्षणे दाखवतात, त्यांच्या हाताखालील कर्मचाऱ्यांना कामाचे कमी समाधान मिळते व त्यांचे नैराश्यही वाढलेले असते. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो तसेच त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये घट होते. १२०० जण या संशोधन कार्यक्रमात सहभागी झाले होते. यामध्ये त्यांचे कार्यालयातले वातावरण, त्यांचे स्वत:चे मानसिक संतुलन, त्यांच्या वरिष्ठांचे व्यक्तिमत्त्व या विषयांशी संबंधित प्रश्न होते. तज्ज्ञांच्या मते वरिष्ठांच्या चुकीच्या सवयींचा, आरडाओरडा करण्याचा परिणाम कर्मचाऱ्यांवर पर्यायाने त्या कंपनीवर अथवा कार्यालयावर होतो. वरिष्ठ स्वत:वर जास्त प्रेम करणारे असल्यास त्यांच्यामध्ये इतरांविषयी दयेची तसेच समजून घेण्याची भावना कमी असते. त्यामुळे असे वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या कामाचे श्रेय स्वत: घेतात, कर्मचाऱ्यांना दुय्यम लेखतात आणि त्यांच्याशी आक्रस्तळेपणाने वागतात. यामुळे कार्यालयातील वातावरण बिघडते आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे कर्मचारी नेहमी असमाधानी असतात.
(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 10, 2017 2:35 am