आठवडय़ात किमान तीनवेळा मांसाहाराचा अभाव आणि व्यायामाच्या अभावामुळे युवकांचे मानसिक आरोग्य ढासळण्याचा धोका असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनात स्पष्ट झाले आहे.कॉफी आणि फास्टफूडमुळे तरुणांचे (३० पेक्षा अधिक वय असलेल्या) मानसिक आरोग्य अधिक संवेदनशील असते.  १८ ते २९ या वयोगटांतील तरुणांचे मानसिक आयोग्य आहारावर अवलंबून असते.

विशेषत: मांसाहारामुळे लक्ष केंद्रित करण्यात मदत करणाऱ्या मेंदूतील भागाला उत्तेजना मिळत असते. मेंदूतील रसायनावर तरुणांचे मानसिक आरोग्य अवलंबून असते, असे अमेरिकेतील बिंगहॅमटन विद्यापीठातील लीना बेगडॅचे यांनी सांगितले.

नियमितपणे मांसाहार केल्यास मेंदूतील सेरेटोनिन आणि डोपामाइन ही रसायने वाढतात. त्यामुळे तरुणांची मन:स्थिती निर्माण होत असते. त्याचप्रमाणे नियमितपणे व्यायाम केल्यास ही मन:स्थिती सुधारण्यास मदतच होते, असे बेगडॅचे म्हणाल्या. त्याच वेळी आठवडय़ातून तीनपेक्षा कमी वेळा मांसाहार आणि नियमित व्यायामाचा अभाव यांमुळे तरुणांची मन:स्थिती ढासळते, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे प्रौढांचे मानसिक आरोग्य आहारातील फळांच्या समावेशावर अवलंबून असते. हे संशोधन नुकतेच ‘न्यूट्रिशनल न्यूरोसायन्स’ या मासिकात प्रसिद्ध झाले आहे. प्रौढांचे मानसिक आरोग्यही अधिक संवेदनशील असते. जेवणाच्या वेळा बदलल्यास त्यांच्या मन:स्थितीवर त्याचा परिणाम होतो, असेही बेगडॅचे म्हणाल्या. कॉफी, फास्टफूडच्या अतिसेवनामुळे त्याचा दैनंदिन जीवनात मानसिक आरोग्यावर परिणाम होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.