केंब्रिज अॅनालिटीकाच्या डेटा चोरी प्रकरणानंतर फेसबुक चांगलंच वादात सापडलं होते. हे प्रकरण शांत होते ना होते तोच फेसबुकसमोर आणखी एक मोठी अडचण उभी राहिली आहे. ५ कोटी फेसबुक अकाउंटची माहिती लीक झाली आहे. शुक्रवारी फेसबुकने ५ कोटी अकाउंट हॅक झाल्याची माहिती दिली.

फेसबुकच्या कॉम्प्युटर नेटवर्कवर झालेल्या सायबर हल्ल्यामध्ये जवळपास 5 कोटी युजर्सची माहिती लीक झाल्याची शक्यता असल्याची माहिती फेसबुकने शुक्रवारी दिली. फेसबुकच्या विशिष्ट कोडमध्ये बदल करून हॅकर्सनी वापरकर्त्यांची माहिती चोरल्याचे उघड झाले आहे. फेसबुकने या प्रकरणी अंमलबजावणी अधिकाऱ्यांना याची तक्रार दिली आहे. तसेच या कोडमध्ये दुरुस्ती केली आहे. फेसबुकने एक फिचर काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ‘View As’ या फिचरच्या माध्यमांतून हॅकर्सने माहिती चोरली आहे. सुरक्षेचा विचार करून फेसबुकने ‘View As’ हे फिचर काढून टाकले आहे. हॅकर्सने ‘View As’ या फिचर्सच्या माध्यमांतून एक्सेस टोकन चोरले होते.

हॅक करण्यात आलेल्या अकाऊंटची माहिती चोरली काय? त्याचा गैरवापर झाला का? याबाबत अद्याप फेसबुककडे कोणतीही माहिती उपलबद्ध नाही. फेसबुकने या हल्ल्यापासून होणारे नुकसान कमी करण्यासाठी शुक्रवारी सकाळी जवळपास ९ कोटी युजर्सना अकाउंट लॉगआऊट करण्यास भाग पाडले होते. हा सायबर हल्ला कोठून झाला याबाबत फेसबुक सध्या शोध घेत आहे. तसेच युजर्सनं पासवर्ड बदलण्याची गरज नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. या प्रकरणाचा आमच्याकडून तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.