धोकादायक कंटेंट कमी करण्यासाठी आता दिग्गज सोशल मीडिया कंपनी फेसबुकने नवीन नियमावली जाहीर केली आहे. नवीन नियमामुळे हानिकारक कंटेंट असणाऱ्या ग्रुप्सवर मर्यादा येतील असं फेसबुकने म्हटलं आहे.

फेसबुकच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या ग्रुप्सवर निर्बंध घातले जातील असं फेसबुकने स्पष्ट केलं आहे. शिवाय वारंवार नियम मोडणाऱ्या ग्रुपच्या सदस्यांवरही कारवाई केली जाईल असं फेसबुककडून सांगण्यात आलं आहे. फेसबुकने एका ब्लॉग पोस्टमध्ये नवीन नियमांबाबत माहिती दिली. आपल्या वापरकर्त्यांना धोकादायक कंटेंट असलेले ग्रुप्स यापुढे सुचवले जाणार नाहीत असं कंपनीने नमूद केलंय. शिवाय नियमांचं उल्लंघन करणाऱ्या ग्रुप आणि त्या ग्रुपमधील सदस्यांवर निर्बध घातले जाणार आहेत.

हानिकारक कंटेंट पोस्ट करणारे ग्रुप्स इतर सदस्यांना सूचवले जाणार नाहीत याची काळजी घेतली जाणार आहे. वारंवार नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना मर्यादित कालावधीसाठी कोणत्याही ग्रुपमध्ये पोस्ट करण्यापासून रोखलं जाईल, हा कालावधी 7 ते 30 दिवसांदरम्यान असू शकतो. कारवाई झालेले युजर ग्रुपमध्ये नवीन सदस्यही जोडू शकणार नाहीत किंवा फेसबुकवर नवीन ग्रुपही तयार करू शकणार नाहीत. तसेच वारंवार नियम उल्लंघन करणाऱ्या ग्रुप आणि ग्रुप अ‍ॅड्मिनवरही निर्बंध घातले जातील. फेसबुकच्या ग्रुप्सचा वापर चुकीची माहिती पसरवण्यासाठी केला जातो, अशा अनेक तक्रारी कंपनीकडे आल्या होत्या. त्यानंतर अखेर कंपनीने नियमबाह्य पोस्ट करणाऱ्या ग्रुप्सवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.