ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम क्षेत्राप्रमाणे आता इ-कॉमर्स क्षेत्रातही स्पर्धा पाहायला मिळत आहे. अॅमेझॉनच्या Amazon Prime या सेवेला टक्कर देण्यासाठी फ्लिपकार्टने Flipkart Plus ही सेवा लॉन्च केली आहे. याबाबतची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती, आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कंपनीने ही सेवा सुरू केली आहे.

Amazon Prime साठी ग्राहकांना 999 रुपये एका वर्षासाठी भरावे लागतात. पण फ्लिपकार्टच्या या सेवेसाठी ग्राहकांकडून कोणतंही शूल्क आकारलं जाणार नाही. त्याऐवजी फ्लिपकार्टकडून ग्राहकांना Plus Coin दिले जातील. फ्लिपकार्टवरुन 250 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त खरेदी केल्यानंतर आपोआप ग्राहकांना हे Plus Coin मिळतील. किमान 50 Plus Coin झाल्यानंतर Flipkart Plus च्या सेवेचा लाभ घेता येईल. या सेवेसाठी फ्लिपकार्टने मेक माय ट्रिप, बुक माय शो, झोमॅटो, हॉट स्टार आणि कॅफे कॉफी डे यांच्याशीही भागिदारी केली असून त्याचाही ग्राहकांना फायदा होईल असं कंपनीने सांगितलं आहे.

अॅमेझॉनच्या प्राईम ग्राहकाला त्याने केलेल्या ऑर्डरची आवश्यकतेनुसार तातडीने डिलिव्हरी मिळते, तसंच त्या ग्राहकाला कंपनीकडून वेळोवेळी विशेष डिस्काउंट मिळत असतात. नेमक्या याच पद्धतीने ग्राहकांना विशेष सेवा देण्यासाठी Flipkart Plus अस्तित्वात आलं आहे. पण अॅमेझॉनच्या तुलनेत Flipkart Plus ला ग्राहक कसा प्रतिसाद हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण प्राइम व्हिडीयो आणि म्युझिक स्ट्रीमिंग या दोन महत्त्वाच्या सेवा फ्लिपकार्टने दिलेल्या नाहीत.