देशामध्ये सोमवारपासून म्हणजेच ४ मे पासून तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाउनला सुरुवात झाली आहे. या लॉकडाउनदरम्यान अनेक ठिकाणी नियम शिथिल करण्यात आले असून जिवनावश्यक वस्तूंबरोबर इतर दुकाने सुरु करण्यासाठी सरकारने काही अटींवर परवानगी दिली आहे. इ-कॉमर्सच्या माध्यमातून होम डिलेव्हरी करण्यासाठीही सरकारने परवानगी दिली आहे. ४ मे पासून ‘फ्लिपकार्ट’ला अत्यावश्यक नसणाऱ्या अनेक गोष्टींच्या ऑर्डर मिळत असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार ‘फ्लिपकार्ट’ने एक अहवाल जारी केला असून त्यामध्ये ग्राहक वेबसाईटवर सर्वात जास्त कोणत्या गोष्टी सर्च करतात यासंदर्भात खुलासा केला आहे.

‘फ्लिपकार्ट’ने दिलेल्या माहितीनुसार कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट म्हणजेच विजेवर चालणारी रोजच्या वापरातल्या गोष्टींसंदर्भात भारतीय लोकं सर्वाधिक सर्च करत आहेत. यामध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, सौंदर्याशी संबंधित उपकरणांचा (ट्रीमर, हेअर ड्रायर वगैरे) समावेश आहे. लोकांनी मीड प्रिमियम रेंज म्हणजेच १५ हजारांच्या आसपास फोन सर्च करण्याचे प्रमाणही वाढले आहे. फ्लिपकार्टवर सर्च झालेल्या अव्वल दहा गोष्टींच्या यादीमध्ये ट्रीमरचाही समावेश झाला आहे. एप्रिलच्या सुरुवातीपासून आतापर्यंत ट्रीमसंदर्भात सर्चमध्ये ४.५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे ‘फ्लिपकार्ट’ने म्हटले आहे. पहिल्यांदाच ट्रीमरसारखी गोष्टीचा अव्वल दहा गोष्टींमध्ये समावेश झाल्याचे सांगितले जात आहे.

लॉकडाउनच्या कालावधीमध्ये साड्यांसंदर्भातही सर्च झाल्याचे ‘फ्लिपकार्ट’ने म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी साड्यांपेक्षा लोकं शूजसंदर्भात १.८ टक्के अधिक सर्च करत असल्याचे आकडेवारीमधून स्पष्ट होतं आहे. लॉकडाउनमुळे कंपन्या बंद असल्याने अनेकजण घरुनच काम करत आहेत. त्यामुळेच हेडफोन्ससंदर्भातील सर्चही २०० टक्क्यांनी वाढला आहे. ऑफिसच्या व्हिडिओ कॉलवरुन होणाऱ्या मिटींग, व्हिडिओ कॉल्स यामुळे हेडफोन्ससंदर्भात सर्चचे प्रमाण वाढल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर गॅस स्टोव्ह, पंखे, एसी, कुलर यासारख्या गोष्टींच्या सर्च करण्याची आकडेवारी दुप्पट झाली आहे. घरीच वेगवेगळे खाद्यपदार्थ करणाऱ्यांची संख्याही अधिक असल्याने स्वयंपाकासंदर्भातील वस्तूंचा सर्चही वाढल्याचे दिसत आहे.