गुगलने ‘धोकादायक’ जाहिराती दाखवणारे जवळपास 600 अँड्रॉइड अ‍ॅप्स प्ले-स्टोअरवरुन हटवले आहेत. कंपनीने एका ब्लॉग पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली. याशिवाय गुगलने, हटवलेल्या अ‍ॅप्सच्या डेव्हलपर्सना Google AdMob आणि Google Ad Manager या दोन प्लॅटफॉर्मवरही बॅन केले आहे.

गेल्या काही काळापासून मोबाइलमधील जाहिरातींद्वारे युजर्सची फसवणुकी करण्याच्या प्रमाणात वाढ झालीये. हटवण्यात आलेल्या अ‍ॅप्सद्वारे युजर्सना अचानकपणे जाहिराती दाखवल्या जात होत्या. या जाहिराती म्हणजे स्पेशल पॉप-अप असतात, त्यामुळे त्यावर नकळत क्लिक होते. अशा अ‍ॅप्सचा उद्देश या जाहिरातींद्वारे पैसे कमावणे आणि अनेकदा डेटा चोरण्याचा उद्देश असतो. अनेकदा त्या जाहिरातींवर क्लिक केल्यानंतर फोन स्लो होणे किंवा GPS व अन्य फीचर्समध्ये अडचणी येतात. त्यामुळे असे अ‍ॅप्स युजर्ससाठी हानिकारक ठरतात.

हटवण्यात आलेले अ‍ॅप्स प्रामुख्याने चीन, हाँगकाँग, भारत आणि सिंगापूरच्या डेव्हलपर्सकडून बनवण्यात आले होते. कंपनीने हटवलेल्या अ‍ॅप्सच्या नावांचा आणि डेव्हलपर्सच्या नावांचा खुलासा केलेला नाही. पण, युजर्सना धोकादायक जाहिराती दाखवणारे अ‍ॅप्स शोधण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणण्यावर काम करत असल्याची माहिती गुगलने दिली. गुगलच्या जाहिरातींच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे कंपनीने हे अ‍ॅप्स हटवले आहेत.