गरजेपेक्षा अत्यंत कमी किंवा अति झोप घेतल्यास हृदयरोग होण्याची तसेच लवकर मृत्यू होण्याची शक्यता वाढते, असे अभ्यासकांना दिसून आले आहे. जगभरातील एक लाख १६ हजार व्यक्तींची या अभ्यासात पाहणी करण्यात आली. त्याचे निष्कर्ष बुधवारी प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

जे लोक दिवसाला गरजेइतक्या म्हणजे, सहा ते आठ तास झोपेपेक्षा अधिक काळ झोपून राहतात, त्यांचा अकाली मृत्यू होण्याची, किंवा त्यांच्यात हृदयरोग किंवा मेंदूतील रक्तवाहिन्यांचे आजार होण्याची शक्यता अधिक असते, असे या संशोधनात आढळून आले आहे. माणसाला दिवसात सहा ते आठ तासांची झोप आवश्यक असते. यापेक्षा अधिक, म्हणजे आठ ते नऊ तास झोप काढणाऱ्यांत ही जोखीम पाच टक्के जास्त असते. नऊ ते दहा तास झोपणाऱ्यांत हा धोका १७ टक्के जास्त, तर दहा तासांपेक्षा जास्त झोपणाऱ्यांत तो ४१ टक्क्यांनी जास्त असतो.

दिवसाला सहा तास किंवा त्यापेक्षा कमी झोपणाऱ्यांत हे आजार होण्याची जोखीम नऊ टक्के असते असेही या संशोधकांना आढळले. पण, त्यासाठी ठोस आकडेवारी मात्र मिळू शकली नाही. रात्री सहा तास किंवा त्यापेक्षा कमी झोपणाऱ्या दर एक हजार व्यक्तींपैकी ९.४ टक्के जणांना हृदयरोग जडतात, किंवा त्यांचा अकाली मृत्यू होतो. हे प्रमाण सहा ते आठ तास झोपणाऱ्यांत ७.८, आठ ते नऊ तास झोपणाऱ्यांत ८.४, नऊ ते दहा तास झोपणाऱ्यांत १०.४, तर दहा तासांहून अधिक झोपणाऱ्यांत १४.८ टक्के इतके आढळले. अर्थात हे प्रमाण या पाहणीच्या निष्कर्षांवर परिणाम करू शकतील, अशा बाबी नियंत्रित करण्याआधीचे आहे.

याबाबत कॅनडातील मॅकमास्टर विद्यापीठीतील पीएचडीचे विद्यार्थी चॉंगशी वॉंग यांनी सांगितले की, प्रौढांमध्ये दिवसाला झोपेचे योग्य प्रमाण सहा ते आठ तास असल्याचे आमच्या अभ्यासात दिसून आले आहे.