सफाईकाम करणाऱ्या महिला किंवा घरात स्वच्छता करताना रसायनांचे फवारे वापरणाऱ्या गृहिणींच्या श्वसनसंस्थेच्या क्षमतेवर विपरित परिणाम होतो. मात्र ज्या महिला अशी कामे करत नाहीत त्यांच्या श्वसनक्षमतेवर असा परिणाम तुलनेने कमी होतो, असे अभ्यासात दिसून आले आहे.

नॉर्वेमधील बर्गन विद्यापीठातील संशोधक सेसिल स्वान्स आणि सहकाऱ्यांनी या विषवार संशोधन केले. त्याचे अहवाल अमेरिकन जर्नल ऑफ रेस्पिरेटरी अ‍ॅण्ड क्रिटिकल केअर मेडिसिन या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत. या अभ्यासात संशोधकांनी ६२३५ रुग्णांवर प्रयोग करून माहितीचे विश्लेषण केले. त्यातून असे दिसून आले की, घरात किंवा अन्यत्र सफाईकाम करणाऱ्या महिलांमध्ये अस्थमाचे प्रमाण अधिक आहे. ज्या महिला सफाईचे काम करत नाहीत नाहीत त्यांच्यात अस्थमाचे प्रमाण ९.६ टक्के आढळले. तर ज्या महिला घरात स्वच्छता करतात त्यांच्यात हेच प्रमाण १२.३ टक्के आणि व्यवसाय म्हणून सफाईकाम करणाऱ्या महिलांत हे प्रमाण १३.७ टक्के आढळले.

स्वच्छतेसाठी वापरात येणाऱ्या रसायनांमुळे अल्पकाळात मानवी शरीरावर काय परिणाम होतात याचा बऱ्यापैकी अभ्यास झाला आहे. मात्र दीर्घकाळात त्याचे काय परिणाम होतात यावर अद्याप पुरेसे संसोधन झालेले नाही. दररोज, हळूहळू ही रसायने श्वसनसंस्थेत साठून तिच्यावर परिणाम करत राहतात, असे सेसिल स्वान्स यांनी सांगितले.