लहानपणापासून आवडत असणाऱ्या गोष्टींमध्ये रमणाऱ्या मुलांचे  भविष्य आनंदी असते, असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. मुलांचा विकास आणि स्मार्ट पालकत्व याबद्दल या सर्वेक्षणात अभ्यास कऱण्यात आला. देशभरात ८०० जणांचा सर्वे कऱण्यात आला. यामध्ये ७३ टक्के पालकांचे म्हणणे होते त्यांच्या मुलांची आवड ही त्यांच्या आनंदाचे प्रतिबिंब असते. १६ टक्के जणांनी मुलांची आवड त्यांच्या छंदाशी निगडीत असल्याचे सांगितले. ११ टक्के जणांची आवड ही त्यांच्या अॅप्टीट्यूटनुसार असल्याचे म्हटले.

हा सर्वे पिनवी (प्ले-इंटरेस्ट-वाईज) यांच्यातर्फे कऱण्यात आला होता. यामध्येही ५४ टक्के पालकांना आपल्या मुलाच्या आवडीबद्दल थोडेफार माहित आहे. २० टक्के पालकांना मुलांच्या आवडीबद्दल काहीच माहित नाही. तर २६ टक्के पालकांना मुलांना काय आवडते याची व्यवस्थित माहिती असल्याचे समजले.

पिनवीच्या संस्थापक आणि सीईओ रचना खन्ना म्हणाल्या, काही पालक मुलांच्या आवडीनिवडीला जास्त महत्त्व देताना दिसतात. मात्र मुलांच्या आवडी या वय, वेळ आणि त्यांचे सामाजिक जडण-घडण यानुसार बदलत असतात. मुलांच्या आवडी पालकांना त्यांचा मुलांबरोबर असणारा दैनंदिन संवाद आणि इतर काही गोष्टींवरुन लक्षात येतो. समाजाच्या दबावामुळे मुले ज्या गोष्टीला जास्त मागणी आहे अशा क्षेत्रात करियर करताना दिसतात. मात्र त्यांच्या आवडीनिवडी यामध्ये मागे राहण्याची शक्यता जास्त असते.

आपल्याला संधी मिळाली असती तर आपण नक्कीच वेगळे करीयर निवडले असते असे अनेक जण आपल्या करीयरच्या एका टप्प्यावर म्हणतात. त्यामुळे दिर्घ कालावधीसाठी ते आपल्या प्रोफेशनवर असमाधानी आणि वैतागलेले असल्याचे दिसते असेही खन्ना म्हणाल्या.