कार घेणे हे जवळपास सगळ्यांच्याच आयुष्यातील एक स्वप्न असते. त्यादृष्टीने ऑटोमोबाईल कंपन्याही आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी फिचर्स आणि किंमत असलेल्या कार बाजारात दाखल करत असतात. देशातील सर्वात मोठी कार कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारुती सुझुकीने आपल्या कारमध्ये ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिरिक्त सेफ्टी फिचर्स लाँच केले आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने या कार अधिक सक्षम असतील असे म्हटले जात आहे. आता हे बदल कोणते आणि त्यामुळे नेमका काय फायदा होणार याबाबत जाणून घेऊया…
कंपनीने आपल्या काही दिवसांत बाजारात दाखल होणाऱ्या कारमध्ये ऑप्शनल अॅक्सेसरीजमध्ये टायर प्रेशर ऑपरेटींग सिस्टम (TPMS) देण्यास सुरुवात केली आहे. याबाबतच्या सूचना कंपनीच्या डिलर्सना देण्यात आल्या असून त्यांच्याकडून सर्वच कारमध्ये या अॅक्सेसरीज बसविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. मारुतीची बेस्ट सेलिंग म्हणून ओळखली जाणारी नवी कार स्विफ्ट, डिझायर आणि ब्रेझा या गाड्यांमध्ये ग्राहकांना हे फिचर्स उपलब्ध होणार आहेत. या तिन्ही कारमध्ये ग्राहकांना आपल्या गरजेनुसार फिचर्स कस्टमाइज करता येणार आहे.
यातील टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम हे फिचर अतिशय महत्त्वाचं आहे. यामध्ये टायरचे प्रेशर दर काही वेळाने तपासले जाते. ते कमी झाल्यास ड्रायव्हरला अलर्ट मिळतो. जर तुमच्या टायरमध्ये हवा कमी असेल आणि गाडीचा वेग जास्त असेल तर टायर फाटण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो, मात्र या नव्या फिचरमुळे अशाप्रकारचे अपघात टाळण्यास मदत होईल. मात्र हे फिचर ऑफिशियल एक्सेसरी म्हणून दिले जात असल्याने त्यासाठी ग्राहकांना १२,९९० रुपये अधिक भरावे लागणार आहेत. याशिवाय ड्रायव्हिंग कंडिशननुसार टायर प्रेशर कमी-जास्त करता येते. त्यामुळे टायर प्रेशर अधिक असल्यास गाडीचा वेग कमी करावा किंवा काही वेळासाठी गाडी थांबवावी.