बालकाच्या सर्वागीण वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक ठरलेले स्तनपान हे मातांच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण करत असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला आहे. काही माता बाळाला योग्य वेळी स्तनपान करता येत नाही म्हणून स्वत:ला दोष देतात. तर काहींना सार्वजनिक ठिकाणी बाळाला स्तनपान करावे लागते म्हणून भीती आणि अपमानित वाटते. मनात कमालीची लज्जा निर्माण होते, अशी निरीक्षणे तज्ज्ञांनी नोंदवली आहेत.
जन्माच्या पहिल्या दिवसापासून ते अडीच वर्षांपर्यंत बाळाच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी स्तनपान पोषक ठरते. हीच बाब मातांच्या मनात रुजलेली आहे. त्याखातर त्या बाळाला योग्य वेळी आणि परिपूर्ण स्तनपान करणे योग्य मानतात. परंतु अनेकदा कार्यालयातील कामाच्या धबडग्यातून बाळाला स्तनपान करता येत नाही आणि ज्या वेळी माता बाळाला घेऊन एखाद्या सार्वजनिक ठिकाणी जातात, तेव्हा लाजेखातर त्यांना स्तनपान करता येत नाही, असे संशोधकांनी म्हटले आहे.
स्तनदा मातांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. या वेळी असे जाणवले की काही कारणास्तव स्तनपान करता आले नाही, किंवा स्तनपान करताना लज्जा उत्पन्न झाली तेव्हा मातांनी स्वत:ला दोष दिलेला आहे. काही मातांच्या मनात भीती अथवा अपमान वाटला. यातून काही माता एकटय़ा असल्याची भावना व्यक्त करतात. काहींच्या मनात आपल्याला रोजच्या जीवनात अपयश आणि अपुरेपणा आल्याची भावना निर्माण होत असते.
संशोधकांनी अशा ६३ स्तनदा मातांच्या वर्तनाचा अभ्यास केला. या वेळी स्तनपान करताना मातांना वेगवेगळ्या भावनांना सामोरे जावे लागले, असे संशोधकांनी स्पष्ट केले.
स्तनपान करताना समाज त्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतो. म्हणजे ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, असे बहुतांश लोकांना वाटत नाही. समाजाचा अशा या अटळ प्रक्रियेला पाठिंबा नसतो. त्यामुळे साहजिकच मातांच्या मनात आपण कुठेतरी हरलो आहोत. स्तनपान केले नाही म्हणून त्या दोषी समजतात आणि करावे लागले म्हणूनही त्यांना त्याबद्दल लज्जा उत्पन्न होते, असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

या साऱ्या गोष्टींना न मानणाऱ्या स्तनदा माता कदाचित स्तनपान करीत असाव्यात; परंतु बहुतेक मातांमध्ये स्तनपानावरून नकारात्मक भाव येतात, ही वस्तुस्थिती आहे. ती कुठेतरी बदलली गेली पाहिजे. त्यासाठी व्यापक मोहिम आवश्यक आहे.
– डॉ. गिल थॉमसन, मुख्य संशोधक, लँकशायर विद्यापीठ.