दरवर्षी येणारा नवरात्रीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यासाठी त्याविषयी किमान माहिती असायला हवी. घरोघरी घट बसविण्याची पद्धत वेगळी असली तरीही त्याबाबतच्या काही गोष्टी आपल्याला माहित असायलाच हव्यात. अशाच घटाविषयीच्या काही गोष्टींबाबतची काळजी घ्यायला हवी.
१. नवरात्रमहोत्सवात कुलाचाराप्रमाणे घटस्थापना आणि मालाबंधन करावे. शेतातील माती आणून तिचा दोन पेरे (बोटाची) जाड चौकोनी थर करावा आणि त्यात (पाच किंवा) सप्तधान्ये घालावी. जव, गहू, तीळ, मूग, राळे, सावे आणि चणे इ.
२. मातीचा किंवा तांब्याचा कलश घेऊन त्यात पाणी, गंध, फुले, दुर्वा, अक्षता, सुपारी, पंचरत्ने किंवा नाणे इत्यादी वस्तू घालाव्यात.
३. सप्तधान्ये आणि कलश स्थापनेचे वैदिक मंत्र येत नसल्यास पुराणोक्त मंत्र म्हणावेत. तेही येत नसल्यास त्या त्या वस्तूचे नाम घेऊन ‘समर्पयामि’ म्हणून नाममंत्रांचा विनियोग करावा. कलशामध्ये माळ पोहोचेल अशी बांधावी.
४. अखंड दीपप्रज्वलन, त्या देवतेचे माहात्म्यपठन (चंडीपाठ), सप्तशतीपाठ, देवीभागवत, ब्रह्मांडपुराणातील ललितोपाख्यानाचे श्रवण, ललिता-पूजन, सरस्वतीपूजन, उपवास, जागरण इत्यादी कार्यक्रम करून क्षमता आणि सामर्थ्य यांनुसार नवरात्रोत्सव साजरा करावा.
देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत
१. देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी; कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणार्या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते.
२. दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी, त्यावर खण व त्यावर नारळ (नारळाची शेंडी देवीच्या दिशेने येईल, असा) ठेवून, आपल्या हाताची ओंजळ छातीसमोर येईल, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहावे.
३. देवीकडून चैतन्य मिळावे व आपली अध्यात्मिक उन्नती व्हावी, यासाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी.
४. साडी, खण व नारळ देवीच्या चरणांवर अर्पण करावा. त्यानंतर तांदळाने तिची ओटी भरावी. तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्य ग्रहण व प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात. त्यामुळे प्राधान्याने तांदळाचा ओटीत समावेश केला जातो.
५. देवीच्या चरणांवरील वस्त्र तिचा प्रसाद म्हणून परिधान करावे व नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करावा.
First Published on October 9, 2018 8:11 pm