लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स आणि सोशल मीडिया वेबसाइट फेसबुकने लॉकडाउन दरम्यान दूरसंचार कंपन्यांच्या नेटवर्कवर अधिक ताण येऊ नये यासाठी आपल्या प्लॅटफॉर्मवरील व्हिडिओंची क्वालिटी कमी करण्याचा निर्णय घेतलाय. याशिवाय हॉटस्टारनेही स्ट्रीमिंग बिटरेट्स कमी करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आता युजर्सना कमी Quality चे व्हिडिओ पाहावे लागणार आहेत.

सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (COAI) सरकारला पत्र लिहून नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, हॉटस्टार यांसारख्या प्लॅटफॉर्म्सना बिटरेट कमी करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली होती. त्यानंतर व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी स्वतःहून बिटरेट्स कमी करण्याची घोषणा केली आहे. याआधी Amazon Prime Video आणि YouTube नेही अशाप्रकारचा निर्णय घेतलाय. ‘आमच्या प्लॅटफॉर्मवर HD आणि अल्ट्रा-एचडी व्हिडिओ स्ट्रीमिंगला डिफॉल्ट ‘स्टँडर्ड डेफिनेशन’वर (SD) सेट केले जाईल, याचा बिटरेट मोबाइल नेटवर्कवर 480p पेक्षा जास्त नसेल. त्यामुळे पुढील काही दिवस ग्राहकांना कमी क्वालिटीचे व्हिडिओ पाहावे लागतील’असे YouTube द्वारे सांगण्यात आले.

करोना व्हायरसमुळे जगातील बहुतांश देशांमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’चे आदेश देण्यात आले आहेत. अनेक शहरे लॉकडाउन झाली असल्याने इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय. युजर्स घरबसल्या व्हिडिओ पाहण्यास पसंती देत असल्याने व्हिडिओंची मागणी प्रचंड वाढली आहे, परिणामी दूरसंचार सेवा देणाऱ्या सर्वच कंपन्यांच्या नेटवर्कवर ताण येतोय. त्यामुळे इटंरनेट स्पीड कमी झाल्याची तक्रार अनेकांकडून केली जात आहे. म्हणून बँडविड्थ कमी होऊ नये यासाठी स्ट्रीमिंग सेवा देणाऱ्या कंपन्या स्ट्रीमिंग बिटरेट्स कमी करण्याचा निर्णय घेत आहेत. अधिक बिटरेटच्या व्हिडिओ स्ट्रीमिंगमुळे नेटवर्कवर दबाव वाढतो आणि मागणी अधिक असल्यास ‘नेटवर्क जाम’ होण्याचाही धोका असतो.