Nokia 7 Plus आणि Nokia 8 Sirocco हे दोन बहुप्रतिक्षित फोन अखेर भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. मागच्याच महिन्यात हा फोन आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाला होता. मात्र तो भारतात येण्यास बराच वेळ लागला. हा फोन आता लाँच झाला असला तरीही त्याच्या प्रीऑर्डर काही दिवसांपूर्वीच सुरु झाल्या होत्या. Nokia 7 Plus अॅमेझॉन इंडियावर तर Nokia 8 Sirocco फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत. ऑनलाइन मार्केटबरोबरच हे दोन्ही फोन संगीता, पूर्विका, क्रोमा, रिलायन्स डिजिटल यांसारख्या रिटेलर्सकडेही उपलब्ध आहेत. एचएमडी ग्लोबलने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही आकर्षक ऑफर्सही जाहीर केल्या आहेत.

Nokia 7 Plus ची किंमत भारतात २५,९९९ रुपये असून मेरा पहला स्मार्टफोन या ऑफरअंतर्गत २ हजार रुपयांची कॅशबॅक देण्यात येणार आहे. याबरोबरच हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सर्व्हीफाय कंपनीकडून १२ महिन्यांचा अपघाती नुकसान विमाही देण्यात येणार आहे. शिवाय सगळ्या मोठ्या बँकांच्या क्रेडीट कार्डवर नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय देण्यात आला आहे. तर Nokia 8 Sirocco ची भारतातील किंमत ४९,९९९ रुपये आहे. या फोनच्या खरेदीवर एअरटेलच्या ग्राहकांना पहिले सहा रिचार्ज मोफत मिळणार आहेत. या रिचार्जची किंमत १९९ रुपये आणि ३४९ रुपये असेल. यावर २० जीबी डेटाही मिळणार आहे. याबरोबरच फ्लिपकार्टवर जुना फोन एक्सचेंज करणाऱ्यांना १९ हजार रुपयांपर्यंतचे डिस्काऊंट मिळणार आहे. तसेच हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मेक माय ट्रीप च्या हॉटेल बुकींगवरही २५ टक्क्यांपर्यंतची सूट मिळेल. आयसीआयसीआयच्या कार्डधारकांना ठराविक कालावधीसाठी १० टक्के कॅशबॅकची ऑफर देण्यात आली आहे.