चीनची स्मार्टफोन कंपनी OnePlus ने १४ एप्रिल रोजी दोन नवे फोन बाजारात उतरवल्यानंतर ४८ तासांच्या आत चीनमध्ये या फोनची विक्री सुरु झाली आह. OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro हे दोन कंपनीने फोन लॉन्च केले आहेत. या दोन्ही फोनबद्दल मागील अनेक महिन्यांपासून टेक जगतामध्ये चर्चा सुरु होती. कंपनीने हे दोन्ही फोन आपले फ्लॅगशीप फोन असतील असं जाहीर केलं आहे. मात्र कालपासून या फोनची चीनमध्ये विक्री सुरु झाल्यानंतर या फोनच्या चीनमधील किंमती पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. युरोपीयन आणि अमेरिकन बाजारपेठेपेक्षा चीनमध्ये हा फोन १३४ डॉलरने (१० हजार रुपयांहून अधिक) स्वस्त किंमतीत उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

चीनमध्ये OnePlus 8 चा बेसिक मॉडेल केवळ तीन हजार ९९९ युआन (५६५ अमेरिकन डॉलर म्हणजेच ४२ हजार रुपयांना) विक्री केला जात आहे. तर OnePlus 8 Pro चा बेसिक मॉडेल पाच हजार ३९९ युआन (७६५ अमेरिकन डॉलर म्हणजेच ५८ हजार रुपयांना) उपलब्ध आहे. अमेरिकन आणि युरोपीयन बाजारपेठांच्या तुलनेत ही किंमत खूपच कमी आहे. युरोपीयन आणि अमेरिकन बाजारपेठांमध्ये OnePlus 8 च्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत ६९९ डॉलर (७६ रुपये डॉलरच्या दराने ५३ हजार १०० रुपये) असून १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत ७९९ डॉलर (६० हजार ७०० रुपये) इतकी आहे. तर OnePlus 8 Pro च्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत ८९९ डॉलर (६८ हजार ३०० रुपये) आहेत. तर १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत ८९९ डॉलर (७५ हजार ९०० रुपये) इतकी असल्याचे कंपनीने लॉन्चिंग सोहळ्यामध्ये जाहीर केलं आहे. युरोपीयन बाजारपेठेमध्ये २१ एप्रिलपासून या फोनची विक्री सुरु होणार आहे.

पाहा फोटो: OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro लॉन्च: जाणून घ्या भन्नाट फिचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

ज्या देशामध्ये कंपनीच्या फोन्सला चांगली मागणी आहे तेथे इतर देशांच्या तुलनेमध्ये OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro हे दोन स्वस्तात उपलब्ध करुन देत इतर कंपन्यांना टक्कर देण्याचा वन प्लसचा विचार असल्याचे समजते. याचा फायदा भारतीय ग्राहकांना होण्याची शक्यता आहे. हा फोन भारतामध्ये युरोपीयन आणि अमेरिकन बाजारपेठांपेक्षा स्वस्तात उपलब्ध करुन देण्याचे संकेत कंपनीने आधीच दिले आहे.

भारतात वन प्लसची स्थिती काय आणि अंदाजे किंमत किती?

मागील अनेक महिन्यांपासून OnePlus हा भारतामधील पहिल्या क्रमांकाचा प्रिमियम फोन आहे. या फोनला भारतामध्ये चांगला चाहतावर्ग आहे. एका सर्वेक्षणानुसार हा भारतामधील सर्वात समाधानकारक सेवा देणारा फोन असल्याचे वृत्तही मंध्यंतरी समोर आलं होतं. याच पार्श्वभूमीवर कंपनीने भारतामध्ये हा फोन युरोपीयन बाजारपेठांच्या तुलनेत स्वस्तात उपलब्ध करुन देण्यासंदर्भातील संकेत दिले आहेत. वन प्लसच्या भारतातील ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात एक ट्विट करण्यात आलं आहे. “वाट पाहणाऱ्यांना नेहमीच चांगल्या गोष्टी मिळतात,” असं ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं आहे. तसेच डॉलरमध्ये मोबाईलच्या ज्या किंमती आहेत त्याबद्दल भारतीयांनी जास्त विचार न करता भारतातील किंमतींची घोषणा होण्याची वाट पहावी असं कंपनीने म्हटलं आहे. “We don’t speak doller$. Indian p₹ices coming soon”, अशा ओळी असणारा फोटो या ट्विटबरोबर शेअर करण्यात आला आहे.

OnePlus 8 हा युरोपीयन बाजारापेठेमधील वन प्लसचा आतापर्यंत सर्वात महागडा फोन आहे. भारतामधील किंमतींची लवकरच घोषणा केली जाईल असं कंपनीमार्फत सांगण्यात येत आहे. अद्याप कोणतीही औपचारिक घोषणा यासंदर्भात करण्यात आलेले नाही. मात्र मोबाईल क्षेत्रातील तज्ज्ञांच्या अंदाजाप्रमाणे OnePlus 8 च्या बेसिक मॉडेलची किंमत भारतामध्ये ४२ हजारांपासून सुरु होऊ शकते. तर OnePlus 8 Pro ची किमान किंमत ५५ हजारांपासून सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र कंपनी यासंदर्भात औपचारिक घोषणा करत नाही तोपर्यंत नक्की या फोनची किंमत किती असेल आणि तो कोणत्या फोन्सला भारतीय बाजारपेठेमध्ये टक्कर देईल हे सांगता येणं तसं कठीणच आहे.

भारतामध्ये मोबाईलवरील जीएसटीमध्ये ५० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. फोनवरील १२ टक्के जीएसटी वाढवून आता १८ टक्के करण्यात आला आहे. तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवर मागणी आणि पुरवठ्याच्या साखळीला फटका बसला आहे. यामुळे भारतामध्ये फोन स्वस्तामध्ये उतरवला तरी तो कधीपर्यंत भारतीयांना प्रत्यक्षात वापरता येईल हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.