वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाशी दीर्घकाळ संपर्क आल्याने लहान मुलांना दम्याचा धोका असल्याचा इशारा एका अभ्यासातून देण्यात आला आहे. हा अभ्यास जर्नल ऑफ अ‍ॅलर्जी अ‍ॅण्ड क्लिनिकल इम्युनोलॉजी या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे.

या अभ्यासासाठी अमेरिकेतील बॉस्टन शहरातील १९९९ आणि २००२ दरम्यान जन्माला आलेल्या १,५२२ मुलांच्या माहितीचे विश्लेषण केले. मुख्य रस्त्यांच्या नजीक राहणाऱ्यांना आणि प्रदूषणाच्या नियमित संपर्कात येणाऱ्या सात ते दहा वर्षांच्या मुलांमध्ये फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होत असल्याचे आमच्या पूर्वीच्या संशोधनातून समोर आले असल्याचे बेथ इस्रायल डेकेनेस मेडिकल सेंटरच्या मेरी बी राईस यांनी सांगितले. अशा प्रकारच्या प्रदूषणामुळे दमा होण्याचा धोका असल्याचा आम्हाला संशय होता,असे राईस यांनी म्हटले. प्रत्येक मुलाच्या घरापासून मुख्य रस्त्याचे अंतर किती आहे हे शोधण्यासाठी संशोधकांनी मॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर केला. त्याचप्रमाणे त्यांनी उपग्रहाद्वारे मिळविलेल्या वातावरणाच्या माहितीनुसार प्रत्येक मुलाला दिवसाला किती प्रदूषणाचा सामना करावा लागतो याची गणना केली. प्रदूषणाचे अतिसूक्ष्म कण हे इंधन ज्वलनामुळे, वाहतूककोंडीमुळे, वीज प्रकल्प यासारख्या प्रदूषणाच्या स्रोतांमुळे वातावरणात पसरतात. मुख्य मार्गापासून १०० मीटरहून कमी अंतरावर राहणाऱ्या सात ते दहा वर्षांदरम्यान ज्या मुलांमध्ये दम्याची लक्षणे आहेत त्यांना दमा होण्याची शक्यता तीन पटीने जास्त आहे. तर मुख्य रस्त्यापासून ४०० मीटर अंतरावर राहणाऱ्या मुलांमध्ये हे प्रमाण कमी असल्याचे संशोधनात आढळले. दीर्घकाळ काळे कार्बन कण आणि सूक्ष्म कणांच्या संपर्कात आल्याने लहान वयात दमा होण्याचा धोका असल्याचे संशोधकांनी सांगितले.