रिलायंस जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक खुशखबर दिली आहे. रिलायंस जिओने आपल्या ग्राहकांची प्राईम मेंबरशिप एका वर्षाने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिओच्या ग्राहकांना प्राईम मेंबरशीपसाठी पुन्हा रिचार्ज करावे लागणार नाही.

रिलायंस जिओच्या भारतीय बाजापेठेतील प्रवेशानंतर सुरू झालेल्या स्पर्धेमुळे सर्वच दूरसंचार कंपन्यांचे धाबे दणाणले होते. रिलायंस जिओने सुरूवातीच्या काळात मोफत कॉलिंग आणि डेटाची सुविधा देण्यास सुरू केली होती. त्यानंतर रिलायंस जिओने आपल्या ग्राहकांसाठी प्राईम मेंबरशीप आणली होती. या अंतर्गत रिलायंस जिओच्या सर्व अॅप्सचे अॅक्सेस ग्राहकांना मोफत देण्यात येत होते.

गेल्या वर्षी रिलायंस जिओने प्राईम मेंबरशीपचा कालावधी एका वर्षांने वाढवला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा प्राईम मेंबरशीप एका वर्षाने वाढवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना जिओच्या सर्व अॅपचे अॅक्सेसही पुन्हा एका वर्षासाठी मोफत मिळणार आहे. दरम्यान, रिलायंस जिओच्या ग्राहकांना माय जिओ अॅपमधील ‘माय प्लान’ या सेक्शनमध्ये आपली मेंबरशीप रिन्यू झाली आहे किंवा नाही याची माहिती मिळणार आहे.

सध्या रिलायंस जिओच्या नव्या ग्राहकांना 99 रूपयांमध्ये जिओ प्राईम मेंबरशीप देण्यात येते. नव्या ग्राहकांना 99 रूपये देऊन तर जुन्या ग्राहकांना ऑटो रिन्यू पद्धतीने जिओ प्राईम मेंबरशीपचा लाभ घेता येणार आहे.