Revolt Motors ने मंगळवारी (दि.19) भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक Revolt RV 400 सादर केली आहे. ही पूर्णतः इलेक्ट्रिक बाईक असून पुढील महिन्यात ही बाईक लाँच केली जाईल. ही बाईक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI – Artificial Intelligence) वर काम करत असल्यामुळे तुम्ही व्हॉईस कमांड देखील देऊ शकता. केवळ एक हजार रुपयांमध्ये 25 जूनपासून या बाइकसाठी आगाऊ नोंदणी देखील सुरू होत आहे.

सुरूवातीला ही बाईक केवळ दिल्लीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल, त्यानंतर पुढील चार महिन्यांमध्ये ही बाइक पुणे, बंगळुरु, हैदराबाद, नागपूर, अहमदाबाद आणि चेन्नई येथेही उपलब्ध होईल. रेबेल रेड आणि कॉस्मिक ब्लॅक या दोन रंगांमध्ये ही बाईक उपलब्ध असेल.
आर्टिफिशिअल इंटेलिजंस (AI) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता फीचर असलेली ही बाईक एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 156 किलोमीटर पर्यंतचा प्रवास करु शकते असा कंपनीचा दावा आहे. या बाईकचा टॉप स्पीड 85 किलोमीटर प्रतितास आहे. घरातील 15 अँपीयर प्लग पॉइंटवर देखील चार्जिंग करता येईल, त्यासाठी कोणत्याही वेगळ्या व्यवस्थेची गरज नाही. पोर्टेबल बॅटरी चार्जरसह ऑन-बोर्ड चार्जिंगची सुविधाही मिळेल. याशिवाय ज्या शहरांमध्ये बाइकची विक्री होईल तेथे मोबाइल बॅटरी स्वॅपिंग पॉइंट लाँच करेल, तसंच बॅटरीची होम डिलिव्हरी देखील केली जाणार आहे.

स्मार्ट इलेक्ट्रिक बाइक –
रिवोल्ट आरवी400 स्मार्ट बाइक आहे, अर्थात यामध्ये अनेक कनेक्टिव्हिटी फीचर्स आहेत. यात जिओ फेंसिंग, बाइक लोकेशन, टेलेमॅटिक्स आणि साउंड सिलेक्शन यांसारखे फीचर्स आहेत. या इलेक्ट्रिक बाइकमध्ये चार प्री-लोडेड मोटरसायकल साउंड्स दिले आहेत. यातून तुमच्या आवडीनुसार साउंड तुम्ही निवडू शकतात. ओव्हर दि एअर अपडेट्सच्या माध्यमातून साउंडसाठी अधिक पर्याय दिले जातील असं कंपनीने सांगितलं आहे. बाइकमध्ये 4G LTE सीम कार्ड असून याद्वारे इंटरनेट आधारित फीचर्स कार्यरत राहतात.

Revolt App –
या बाइकसाठी कंपनी Revolt App देखील लाँच करणार आहे, यात अनेक फीचर्स असतील. हे अॅप टेलेमॅटिक्सच्या माध्यमातून बाइकमधील रायडिंग डेटा कलेक्ट करतं. यानंतर युजरला उत्तम रायडिंगचा अनुभव मिळावा यासाठी अॅनालिटिक्सचा वापर केला जातो. यामध्ये रिमोट स्टार्ट, बाइक लोकेशन, रिअल-टाइम रायडिंग इन्फॉर्मेशन, नेव्हिगेशन, बॅटरीसाठी ऑर्डर, जवळील मोबाइल बॅटरी स्वॅपिंग पॉइंटची माहिती आणि बाइकमधील साउंड बदलण्यासारखे 20 पेक्षा अधिक फीचर्स आहेत. तसंच या अॅपवर तुम्ही बाइकचे कागदपत्र, वाहन परवाना अशाप्रकारची महत्त्वाची कागदपत्र देखील अपलोड करु शकतात. मात्र, अद्याप या बाइकच्या किंमतीचा खुलासा करण्यात आलेला नाही.