गाढ झोपेमुळे स्मृती वाढते असे निदर्शनास आले असून ती प्रक्रिया नेमकी कशी घडते यावरही वैज्ञानिकांनी प्रकाश टाकला आहे. आपण आपल्या जीवनातील किमान एक तृतीयांश वेळ तरी झोपेत घालवतो, पण ते आवश्यक असते, कारण गाढ झोपेमुळे स्मृती वाढते. रिव्हरसाइड येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनानुसार संथ लहरी असलेली झोप स्मृती बळकट करण्यास उपयोगी असते. झोपेत माणूसच काय, पण प्राण्यांच्या संवेदन अग्रांची क्षमता वाढत असते. त्यामुळे मेंदूच्या हिपोकॅम्पस भागात बरीच सक्रियता विद्युत तरंगांच्या माध्यमातून दिसते. जास्त तरंगलाबीची दोलने कॉर्टेक्स भागात दिसतात. त्यात शांत व सक्रिय अशा मेंदूच्या अवस्था समजतात, त्यात कॉर्टेक्समधील न्यूरॉन्स दीर्घकाळ स्मृती तयार करण्यात मदत करीत असतात. जागेपणी आपण काही स्मृती अर्जित करीत असतो, पण ती नंतर दीर्घकालीन साठवणुकीत रात्रीच्या झोपेवेळी जाते, त्यामुळे रात्रीची झोप फार महत्त्वाची असते. एलएसडी प्रयोगात दृष्टीशी संबंधित काही भाग स्वप्ने पडताना वापरला जातो. संगणकीय सादृश्यीकरणाच्या मदतीने लहान बाळाच्या झोपेचा हा अभ्यास करण्यात आला असता गाढ झोपेत विद्युत स्पंदने जास्त दिसतात व सिनॅप्टिक जोडण्या न्यूरॉनमध्ये वेगाने घडून येतात. त्यामुळे कॉर्टेक्समधील स्पंदने कमी होतात. मंद दोलने ही कॉर्टेक्समधील सिनॅपटिक बदल घडवत असतात. संशोधक यिना वेई यांनी सांगितले की, हिप्पोकॅम्पसचे संदेश झोपेत कॉर्टेक्सकडे जातात व त्यामुळे दोलने मंद होऊन वेगळा परिणाम घडून स्मृती पक्क्या होतात. न्यूरोसायन्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)