तुमच्याकडे ओप्पो, शिओमी, जिओनी, व्हिवो  सारख्या चिनी कंपन्यांचे मोबाईल असतील? तर सावधान! कारण त्यातील डेटा चोरला जात असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. बाजारातील या मोबाईल कंपन्या चीनच्या आहेत आणि या कंपन्यांच्या मोबाईलला भारतीय बाजारात मोठी मागणीही आहे. मात्र चीन सरकारकडूनच या मोबाईलमधील डेटा चोरला जात असल्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही जर चिनी कंपनीचा मोबाईल वापरत असाल तर काळजी घ्या.

सरकारला या गोष्टीची कल्पना आल्याने सरकारकडून  ओप्पो, शिओमी, जिओनी, व्हिवो  यासारख्या २१ चीनी मोबाईल कंपन्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या कंपन्या भारतात आपले मोबाईल तयार करतात आणि विक्रीही करतात. मात्र या कंपन्यांचे मुख्य सर्व्हर चीनमध्ये आहेत. ग्राहकांची मेसेजेस, संपर्क क्रमांक, फोनमधील छायाचित्रे अशाप्रकारची खासगी माहिती चोरली जात असल्याचा संशय निर्माण झाला आहे. यामुळे ही खासगी माहिती चीनकडे सहज उपलब्ध होऊ शकते.

सरकारतर्फे सुरक्षेच्या कारणास्तव कारवाई करण्यात येत आहे. ‘बिझनेस स्टॅंडर्ड’ने दिलेल्या वृत्तानुसार या कंपन्यांनाकडून लेखी खुलासे मागविण्यात आले आहेत. याशिवाय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे चायनीज कंपनीशिवाय अॅपल, सॅमसंग, ब्लॅकबेरी आणि इतर भारतीय बनावटीच्या कंपन्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. या सर्व कंपन्यांनी २८ ऑगस्टपर्यंत या नोटीशीला उत्तर द्यावे असे सांगण्यात आले आहे.