स्मार्टफोनच्या जमान्यामध्ये हे सगळं जग आपल्या हातात आलंय हे खरं. पण आपली माहितीही या स्मार्टफोनच्याचा माध्यमातून सगळ्या जगाकडेही जाते आहे. आपण सोशल नेटवर्कवर जी माहिती टाकतो ती तर सगळ्यांना दिसते हे आतापर्यंत सगळ्यांनाच माहीत आहेच. पण आपण जी माहिती ‘पब्लिक’ करणे टाळतो आणि आपल्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह करून ठेवतो ती माहितीसुध्दा एखाद्या हॅकरच्या हल्ल्यामुळे जगजाहीर होऊ शकते.

८ नोव्हेंबरला झालेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभर डिजिटल व्यवहारांना चालना मिळाली. आधार कार्डाच्या रूपाने कोट्यवधी भारतीयांच्या माहितीचा एक डेटाबेस तयार करण्यात आला. सरकारी पातळीवर हा डेटाबेस सुरक्षित ठेवण्याची खबरदारी घेतली जात असली तरी वैयक्तिक पातळीवर आपल्या स्मार्टफोनमधला डेटा कसा सुरक्षित ठेवावा यासंबंधी म्हणजेच ‘डिजिटल सिक्युरिटी’ विषयी सामान्या नागरिकांमध्ये म्हणावी तेवढी जागृती झालेली नाही. त्यामुळे आपल्या फोनमध्ये आपण सेव्ह केलेली बँक अकाऊंट नंबरसारखी माहिती दुसऱ्याच्या हातात पडू शकते याची जाणीवच या नव्याने आॅनलाईन होणाऱ्या यूझर्सना नाही. आपल्या फोनमधला डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी पुढील पावलं आपण उचलू शकतो

१. अनोळखी वाय-फाय नेटवर्कचा वापर टाळणे

सध्या वाय-फाय नेटवर्क इतका परवलीचा शब्द झाला आहे की जिकडे तिकडेच अगदी सरकारकडूनही;  सार्वजनिक ठिकाणी वायफाय सेवेचं मोठ्या वाजतगाजत उद्घाटन केलं जातं. रेल्वे स्टेशनसारख्या ठिकाणी असणारी ही फ्री वाय-फाय सेवा कितीही आकर्षक वाटत असली तरी त्याचा वापर टाळणंच योग्य आहे. कारण अनेकदा या सार्वजनिक वाय-फाय नेटवर्कवर हॅकर्सची नजर असते आणि हे नेटवर्क वापरत आपण पाठवलेला किंवा रिसिव्ह केलेला डेटा या हॅकर्सच्या तावडीत सापडू शकतो. ‘हाईडनिंजा’ सारखी काही अॅप्स वापरून आपण सार्वजनिक वाय-फाय नेटवर्कवरूनही काहीशा सुरक्षितपणे डेटा पाठवू शकतो पण अशा नेटवर्कचा वापर टाळणंच योग्य. आपल्या मोबाईलच्या डेटा प्लॅनमध्ये पेैसे जरूर जातात पण आपली माहिती सुरक्षित राहते.

२. स्मार्टफोनसाठी अँटिव्हायरस साॅफ्टवेअर अॅप विकत घेणे

पूर्वी काँप्युटरसाठी आपण जसं अँटीव्हायरस साॅफ्टवेअर विकत घ्यायचो तसंच आता आपल्या अँड्राॅईड फोनसाठीही अशा साॅफ्टवेअरच्या अॅपची गरज निर्माण झाली आहे. एका वर्षासाठी दीडशे ते पाचशे रूपयांमध्ये मिळणारी ही अँटीव्हायरस अॅप्स तुमच्या अँड्राॅईड फोनला व्हायरस, मालवेअर, रॅन्समवेअर अशा अनेक ‘थ्रेट्स’पासून सुरक्षित ठेवतात. तसंच आपल्या फोनवरचा नको असलेला डेटा काढायला मदत करत आपल्या फोनचा परफाॅर्मन्सही सुधारतात. अँड्राॅईड मार्केटमध्ये एव्हीजी, नाॅर्डन, अविरा, अव्हास्ट, क्विक हील अशी अनेक चांगली अॅप्स उपलब्ध आहेत. या अॅप्सची माहिती वाचून त्यांची तुलना करत आपल्याला सूट होईल असं अॅप घ्यावं. या अॅप्सचं फ्री व्हर्जन घेण्यापेक्षा त्यांचं ‘पेड व्हर्जन’ जास्त फायदेशीर ठरतं. या अॅप्सची किंमतही फार नसते. ‘अॅपल’ च्या डिव्हायसेसना अजून व्हायरसचा धोका तितकासा निर्माण झालेला नाही. पण ही साॅफ्टवेअर्स ‘आयओएस’मध्येही उपलब्ध असतात.

 ३. एन्क्रिप्शन वापरणं

अँड्राॅईड फोनमधला आपला डेटा ‘एन्क्रिप्ट’ करण्याची सोय प्रत्येक अँड्राॅईड फोनमध्ये उपलब्ध असते. त्यासाठी सेटिंग्डमध्ये जात एन्क्रिप्ट (Encrypt) हा पर्याय निवडता येतो. या पर्यायामुळे आपल्या फोनमधल्या डेटाभोवती एकप्रकारचं सुरक्षाकवच तयार होतं.

४. अधिकृत अॅप स्टोअर्समधलीच अॅप्स डाईनलोड करणं टाळणं

नेटवरती अनेकदा ‘हे अॅप डाऊनलोड करा’ सारखे मेसेजेस् येत असतात’. पण गूगलच्या ‘प्ले स्टोअर’ किंवा अॅपलच्या ‘अॅप स्टोअर’च्या बाहेर उपलब्ध असलेली ही अॅप्स डाऊनलोड करणं आपल्या फोनसाठी, आणि त्यातल्या डेटासाठी अतिशय घातक ठरू शकतं. त्यामुळे अशी अॅप्स डाऊनलोड करणं शक्यतो टाळावं.

५. आपली ‘आॅपरेटिंग सिस्टिम’ अपडेटेड ठेवणं

हॅकर्स दरदिवशी हॅकिंगच्या नव्यानव्या कल्पना शोधत असतात. त्यावर नजर ठेवत अॅप बनवणाऱ्या कंपन्या आपलं अॅप अपडेट करत त्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने आणखी सुधारणा करत असतात. हे अपडेटस डाऊनलोड करत आपलं अॅप अप टू डेट ठेवणं हे सुरक्षेच्या दृष्टीने कधीही चांगलं असतं