स्मार्टफोनची बॅटरी हा एक फार मोठा डोकेदुखीचा प्रकार असतो. नवीन स्मार्टफोन आपण घेतो खरं. पण त्यामधली बॅटरी चांगलीच असेल असं काही नसतं. तसंच नवे मोबाईल गेम्स आणि अॅप्स भरपूर बॅटरी वापरतात. त्यामुळे आपली बॅटरी सतत डाऊन होत राहते आणि कामाच्या वेळेला आपल्याकडे बॅटरी राहात नाही. बॅटरीची बचत करायची आहे का? तर पुढील टिप्स वापरा

१. काळा रंग असलेला वॉलपेपर वापरा

काळा रंग स्क्रीनवर दाखवायला फोनची बॅटरी जास्त खर्च होत नाही. याउलट वेगवेगळे रंग असणारे वॉलपेपर असले तर जास्त बॅटरी खर्च होते.

२. ‘वायब्रेशन’ ऑफ करा

आपला फोन आपल्याला सायलंट मोडवर ठेवायचा असेल तर व्हायब्रेशन मोड खूप कामी येतो. पण जर तसं नसेल तर व्हायब्रेशन्स ऑफ ठेवा. त्याचप्रमाणे तुम्ही एखादा आयकॉन टॅप केल्यावर होणारे व्हायब्रेशन्स म्हणजेच ‘हॅप्टिक’ व्हायब्रेशन्स बंद ठेवा. याने बॅटरीची खूपच बचत होते.

३. लोकेशन ट्रॅकिंग ऑफ करा

आपल्या फोनमधली बहुतांशी अॅप्स आपलं लोकेशन ट्रॅक करत असतात. लोकेशन ट्रॅकिंगची प्रत्येक वेळेला गरज नसते. जर तुम्ही फक्त ई-मेल पाठवत असाल किंवा सिनेमा पाहत असाल तर आपण लोकेशन ऑफ करून बॅटरी वाचवू शकतो.

४. एअरप्लेन मोड वापरा

हा काही रोजच्या जीवनातला उपाय नाही. पण जर तुम्ही कमी नेटवर्क असलेल्या ठिकाणामधून प्रवास करत असाल आणि तुम्हाला कुठले महत्त्वाचे कॉल्स येणार नसतील तर हा पर्याय निवडून तुमचीच बॅटरी तुम्ही खूप वाचवू शकता.

५. ‘ऑटो-सिंक’ बंद करा

तुमचे अॅप्स सारखे ‘सिंक’ किंवा अपडेट होत असतात. ऑटो सिंक बंद केल्यानेही बॅटरीची मोठ्या प्रमाणावर बचत होत असते.

६. जीपीएस बंद करा

जीपीएस, ब्लूटूथ, एनएफसी, वाय फाय डिटेक्टर यांसारख्या सर्व्हिसेस गरज नसताना बंद ठेवा. त्यानेही बॅटरी खूप वाचते.