आपल्या आवडत्या कलाकाराला एका नव्या लूकमध्ये पाहिल्यावर अनेकांनाच आपणही त्या लूकचा प्रयोग करुन पाहावा अशी इच्छा होते. हल्लीच्या तरुणाईमध्ये रोजच्या राहणीमानात लूकला जास्त महत्त्वं दिलं जातं. विविध ठिकाणी जाताना आपण जेथे जात आहोत ती जागा, तो कार्यक्रम या सर्व गोष्टी अंदाजात घेतल्यानंतरच हल्ली त्या कार्यक्रमासाठीच्या लूकची निवड केली जाते. बहुविध लूक्सच्या या गर्दीत सर्वाधिक लोकप्रिय ट्रेंड म्हणजे, कलर डेनिमचा. वॉर्डरोबमध्ये असणारं एक भन्नाट कलेक्शन किंवा कपड्यांचा जोड म्हणजे कलर डेनिम. कलर डेनिम ही संकल्पना जितकी नवी आहे तितकीच हटकेसुद्धा.

डेनिमच्याच प्रकाराच मोडमाऱ्या या कलर डेनिमला गेल्या काही दिवसांपासून तरुणाईमध्ये कमालीची पसंती मिळाली आहे. ज्याप्रमाणे एखाद्या साध्या कुर्त्यावर लेगिन्स मॅच केली जाते, अगदी त्याचप्रमाणे कलर डेनिमचा वापर केला जातो. फक्त कुर्त्यावरच नव्हे, तर विविध प्रकारचे टॉप्स, बंदगळा कुर्ते यांच्यासोबतही कलर डेनिमचा जोड देता येते. पण, या कलर डेनिम वापरताना काही गोष्टी आवर्जून लक्षात घ्याव्या लागतात, जेणेकरुन हा लूक आणखीन उठावरदार आणि प्रभावी करता येऊ शकतो. स्पायकर इंडियाचे डिझायनर हेड अभिषेक यादव यांनी याविषयीच्या काही खास टिप्स दिल्या आहेत… चला तर मग या जाणून घेऊया कलर डेनिम कॅरी करण्याच्या काही खास टिप्स

जीन्स फीट : जीन्स घेताना कधीही कमरेचं माप लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यातही कलर डेनिम घेताना आपल्या बॉडी टाईप नुसारच कलर डेनिम पसंत करावी. विशेषत: गडद निळ्या रंगाची जीन्स स्किनी फिट व रेग्युलर फिटिंग मध्ये उपलब्ध असते. अशा डेनिम सर्व बॉडी टाईप वर शोभून दिसतात.

रंग : कलर डेनिम निवडताना आपल्या स्किनटोनचा (त्वचेच्या रंगाचा) देखील विचार करावा. त्याशिवाय कोणत्या ठिकाणी जात आहात, हे सर्वप्रथम ध्यानात ठेवलेलं बरं. उदाहरणार्थ ऑफिस, आऊटिंग किंवा पार्टीला जाताना त्यानुसारच कपड्यांची नवड करावी. आपल्या स्किनटोनला साजेशी कलर डेनिम निवडावी. ही निवड करताना फारशा अडचणी येणार नाहीत, कारण अनेक विविध रंगांमध्ये या डेनिम बाजारात उपलब्ध आहेत.

टॉपवेयरचे पर्याय : आपण डेनिम कोणत्या टॉप किंवा शर्ट वर घालणार आहेत त्यानुसारच डेनिम ची निवड करावी. ऑफिसमध्ये सहसा डार्क रंगाची डेनिम वापरली तर एखादा चेक्स किंवा प्लेन टॉप किंवा टि-शर्ट वापरावा. फिकट रंगाची डेनिम असल्यास त्यावर फ्लोरल प्रिंटचा एखादा टॉप फ्रेश लूक देतो. न्यूट्रल रंग उदाहरणार्थ पांढरा, राखाडी अशा रंगांचे टॉपवेयर गडद रंगांच्या कलर डेनिमवर शोभून दिसतात.

कार्यक्रमाचं महत्त्वं : पार्टी ऑफिस किंवा एखाद्या ट्रिपमध्ये सर्वात हटके दिसण्यासाठी कलर डेनिम हा ‘ऑल टाईम बेस्ट’ ऑप्शन आहे. मुख्य म्हणजे साधा पण, तितकाच लक्षवेधी लूक म्हणूनही कलर डेनिमला अनेकांची पसंती मिळते.

नवी स्टाईल: जेव्हा तुम्ही एखादी डेनिम निवडता, तेव्हा ती केवळ फिटिंग किंवा कलरनुसारच नाही, तर डिझाईन व स्टायलिंग याची उत्तम सांगड असणंही महत्त्वाचं असतं.

कापड: कलर डेनिम खरेदी करताना त्याचा दर्जा लक्षात घेणं फार महत्त्वाचं महत्त्वाचे असते. जेव्हा आपण डेनिम घालतो, ती बराच वेळासाठी आपल्या त्वचेच्या संपर्कात येते. अशावेळी त्याचा दर्जा व त्यामध्ये असणाऱ्या नैसर्गिक आणि कृत्रिम धाग्यांचा वापर या सर्व गोष्टींवर लक्ष द्यावे. मुख्य म्हणजे सुती धाग्यांचं प्रमाण जास्त असणाऱ्या डेनिमची निवड करावी. त्यासाठी त्या कपड्याची माहिती पाहण्यास काहीच हरकत नाही.

डेनिमचं वजन: सीझननुसार डेनिमचं सिलेक्शन करावं. वजनाने हलक्या डेनिम या उन्हाळ्यात वापराव्यात. तर मिडियम वेट डेनिम या कधीही वापरता येऊ शकतात. थंडीच्या दिवसांमध्ये जास्त वजनाच्या डेनिम निवडण्यास काहीच हरकत नाही.