03 March 2021

News Flash

अनुभवातून शिका पैशांचे व्यवस्थापन

मागील वर्षी मिळालेली शिकवण ठरेल उपयोगी

पैशाच्या बाबतीत तुम्हाला भूतकाळात जे काही धडे मिळालेले आहेत त्यावरून तुम्ही तुमची भविष्यातील आर्थिक स्थिती सुधारू शकता. गुंतवणूकदारांसाठी आणि कर्जदारांसाठी २०१८ हे वर्ष आव्हानात्मक होते. गुंतवणूकदारांना इक्विटी आणि डेट गुंतवणूक बाजारपेठेत अस्थिरता अनुभवास आली. त्याच काळात व्याजदरात अनेक वेळा वाढ केल्यामुळे कर्जाच्या बाबतीत तुमच्या खिशावर अधिकच भार पडला. आर्थिक बाजारपेठेतील चढउतारांमुळे २०१८ मध्ये पैशाच्या बाबतीत अनेक धडे मिळाले, हे धडे कोणते होते ते आता आपण पाहू या.

स्मॉल आणि मिड-कॅप फंड्‌स दीर्घकाळासाठी सर्वोत्तम

गेल्या २-३ वर्षांमध्ये व्याजदर जसजसे कमी होत गेले, तसतसा मोठ्या परताव्याच्या अपेक्षेमुळे गुंतवणूकदारांच्या खिशातून म्युच्युअल फंडांच्या बाजारात पैशाचा ओघ वाढत गेला. स्वत:च्या जोखीम घेण्याच्या क्षमतेविषयी किंवा गुंतवणुकीसाठीच्या आदर्श कालावधीबद्दल खात्री नसल्याने बऱ्याच लोकांनी त्यांचा पैसा स्मॉल आणि मिड-कॅप फंडांमध्ये गुंतवला. २०१८ मध्ये स्टॉक मार्केटमधील अस्थिरतेमुळे या फंडांचे एनएव्ही कमी झाले. मागील वर्षात झालेला नफा पुसला गेला, ज्यामुळे अनेक मनी पोर्टफोलिओ खोल गर्तेत गेले. काही गुंतवणूकदारांना आणखी तोटा होण्याची भीती वाटली आणि तोटा सोसून त्यांनी त्यांचे पैसे काढून घेतले. स्मॉल आणि मिड-कॅप म्युच्युअल फंडांसह दीर्घ ते अतिदीर्घ गुंतवणूक कालावधी असणे गरजेचे असते. अधिक कालावधीमुळे तुम्हाला एसआयपीमध्ये गुंतवणूक करून बाजारातील अस्थिरता सरासरीवर आणण्याची संधी उपलब्ध होत असते. अशा प्रकारे तुम्हाला आकर्षक परतावा मिळू शकतो आणि बाजारपेठ गटांगळ्या खात असते तेव्हा बाहेर पडण्याची गरज भासत नाही.

डेट फंड्‌सही असुरक्षित असू शकतात

२०१८ मध्ये एका मोठ्या लॉजिस्टिक कंपनीला आणि तिच्या उपकंपन्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही. त्यानंतर त्यांची पत खूपच खालावली. या धक्क्यामुळे इक्विटी आणि डेट मार्केट्‌सची पीछेहाट झाली. कॉर्पोरेट्‌स आणि एचएनआयज्‌ यांच्यासारख्या मोठ्या गुंतवणूकदारांनी त्यांचे पैसे काढून घेतले. काही डेट म्युच्युअल फंड – अगदी ज्यांना सर्वात सुरक्षित समजले जाते असे लिक्विड फंडही – अस्थिर बनले, कारण त्यांचा ह्या कंपनीच्या व्यावसायिक कागदपत्रांशी संबंध येत होता, ज्यांची मुदतपूर्तीनंतरची किंमत शून्य झाली. अशाप्रकारे परिणाम झालेले फंड्‌स कालांतराने जरी सुधारले, तरी यातून मिळणारा धडा असा आहे की, तुमची जोखीम कमी करण्यासाठी तुमची गुंतवणूक वैविध्यपूर्ण असली पाहिजे, तीही फक्त वेगवेगळ्या असेट क्लासेसमध्ये नव्हे तर वेगवेगळ्या फंड हाऊसेसमध्येही असली पाहिजे. अस्थिर झालेल्या काही लिक्विड फंडांची या कंपनीतील गुंतवणूक १० टक्के होती. म्हणून दुसरा धडा असा की, एखाद्या विशिष्ट बाँड किंवा कमर्शिअल पेपरशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर संबंध येत असलेल्या अशा प्रकारच्या डेट आणि लिक्विड फंडाला तुम्ही टाळले पाहिजे. बाजारातील जोखीम कमी करण्यासाठी विविधीकृत म्युच्युअल फंड योजना निवडा.

इक्विटी रिडम्शन स्ट्रॅटेजी ठरविण्याची वेळ

२०१८ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दरम्यान इक्विटीमधील गुंतवणुकीवर मिळणाऱ्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावर नवीन कर लागू करण्याची घोषणा करण्यात आली आणि त्याचबरोबर डिव्हिडंड डिस्ट्रिब्युशन टॅक्सही लावण्यात आला. १ लाख रुपयांच्या इक्विटी दीर्घकालीन भांडवली नफ्यावरील १० टक्के कर या अॅसेट क्लासमधली मजा काही अंशी कमी करतोय. जो मागील अनेक वर्षे करमुक्त होता. म्हणून तुमच्या इक्विटी रिडम्शनचे नियोजन करून तुमच्या करांना नियंत्रणात ठेवण्याची हीच वेळ आहे. छोटे गुंतवणूकदार १ लाख रुपयांच्या मर्यादेत दीर्घकालीन भांडवली नफ्याची रक्कम आयकर विवरणात दाखवू शकतात आणि अशाप्रकारे नफा पूर्णत: करमुक्त करू शकतात. तुम्ही जर इक्विटीमधील गुंतवणूक तुमची आई, वडील, पत्नी इत्यादींसारख्या तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये विभागून घेतलीत, तर तुमचा वैयक्तिक कर आणखी कमी होऊ शकतो.

टॅक्स प्लॅनमध्ये तुमच्या आईवडिलांना भागीदार बनवा

२०१८ च्या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिक असलेल्या करदात्यांसाठी करविषयक अनेक फायद्यांची घोषणा करण्यात आली होती. ज्येष्ठ नागरिक असलेल्या गुंतवणूकदारांसाठी व्याजातून मिळणारे ५०,००० रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले होते आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्यविम्यासाठीची कर वजावटही प्रत्येक वर्षासाठी ५०,००० रुपयांपर्यंत वाढविण्यात आली होती. तुम्हाला जर तुमचे पैसे मुदतठेवींमध्ये किंवा व्याज मिळवून देणाऱ्या इतर इन्स्ट्रुमेंट्‌समध्ये गुंतवायचे असतील, तर तुमचे करपात्र उत्पन्न कमी करण्यासाठी तुम्ही ज्येष्ठ नागरिक असलेल्या तुमच्या आईवडिलांच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. आयकर अधिनियम अंतर्गत आईवडिलांच्या खात्यात गिफ्ट म्हणून पैसे हस्तांतरित करण्यावर कर आकारला जात नाही. म्हणून व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नावरील कर वाचविण्यासाठी तुम्ही १ लाख रुपयांपर्यंत तुमच्या आई आणि वडिलांच्या नावाने गुंतवणूक करू शकता.

करन्सीवर लक्ष ठेवा

२०१८ मध्ये क्रिप्टोकरन्सी मार्केट कोलमडले होते. ज्या लोकांना अल्पकालीन फायद्यासाठी अनटेस्टेड इन्स्ट्रुमेंट्‌समध्ये स्वारस्य असेल त्यांनी आता विशेष काळजी घेतली पाहिजे. क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यवहार करणे भारत सरकारने आधीच बेकायदेशीर म्हणून घोषित केलेले आहे. २०१८ मध्ये भारतीय रुपयाचे मूल्य अमेरिकन डॉलरच्या तुलनेत जानेवारीमध्ये असलेल्या ६३.३९ च्या उच्‍चांकावरून ऑक्टोबर, २०१८ मध्ये ७४.२ एवढे कमी झाले. ज्या लोकांनी परदेशवारीचा विचार केलेला होता, त्यांना विमानभाडे आणि हॉटेलच्या किमतीतील वाढीचा सामना करावा लागला. तुम्हाला जर परदेशवारी करायची असेल, तर प्रवास करण्याच्या तारखेच्या आसपास होणारा तोटा टाळण्यासाठी आधीच फोरेक्स खरेदी करा.

आदिल शेट्टी

सीईओ, बँकबझार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2018 3:58 pm

Web Title: what we learnt about money management in 2018
Next Stories
1 ‘ड्राय जानेवारी’ संकल्पातून आरोग्यसिद्धी!
2 शीतपेयांमुळे मूत्रपिंड विकारांची जोखीम अधिक
3 flashback 2018 : ‘हे’ आहेत वर्षभरातील स्वस्तात मस्त स्मार्टफोन
Just Now!
X