लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp एका शानदार फीचरवर काम करत होतं, पण आता हे फीचर युजर्सना वापरायला मिळणार नाही, अशी शक्यता आहे. WhatsApp चे फीचर्स ट्रॅक करणाऱ्या WABetaInfo ने ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपकडून ‘व्हॅकेशन मोड’ नावाचं एक नवीन फीचर आणलं जाणार होतं. कंपनी या फीचरवर 2018 पासून काम करत होती. पण आता कंपनीने या फीचरची टेस्टिंग बंद केली आहे.

व्हॅकेशन मोड फीचरच्या मदतीने मेसेजेसना पूर्णपणे इग्नोर आणि चॅट्स लपवता येतात, असं समोर आलं होतं. याद्वारे ‘Archive चॅट्स इग्नोर’ चा पर्याय युजर्सना मिळाला असता. म्हणजे युजर्स सुट्टीवर असताना सर्व चॅट्स आणि मेसेजकडे दुर्लक्ष करुन या अ‍ॅपपासून ब्रेक घेऊ शकत होते.

सध्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये Archive चॅट सर्वात खाली जातात, पण त्यावर एखादा मेसेज आला की आपोआप Archive चॅट वरती येतात आणि मेसेज दिसू लागतात. त्यामुळे Archive चॅट्स लपवण्यासाठी आणि व्हॉट्सअ‍ॅपपासून दूर राहण्यासाठी व्हॅकेशन मोड फीचर फायदेशीर ठरलं असतं. मात्र आता कंपनीने या फीचरवर काम करणं बंद केलं आहे, त्यामुळे युजर्सना हे फीचर वापरायला मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.