How To Kill Mosquitoes In Home : उन्हाळ्यात डासांचा धोका खूप वाढतो. या दिवसांत विशेषत: संध्याकाळी घरांमध्ये डासांची संख्या वाढू लागते, ज्यामुळे डेंग्यू आणि मलेरियाचा धोकादेखील लक्षणीयरीत्या वाढतो. अशावेळी डासांना पळवून लावण्यासाठी बरेच लोक बाजारातून विविध प्रकारचे केमिकल स्प्रे, कॉइल्स खरेदी करतात. मात्र, त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे डासांना नैसर्गिक पद्धतीने सहज पळवून लावण्यासाठी तुम्ही कापराचा वापर करू शकता.
कापराचे खालील उपाय फॉलो केल्यास तुम्हाला घरात एकही डास, माश्या दिसणार नाही.
१) कापूर आणि पाणी
कापूर आणि वॉटर स्प्रेच्या मदतीने तुम्ही डासांना सहज पळवू शकता. यासाठी एक ग्लास पाण्यात दोन कापराचे तुकडे टाकून चांगले मिक्स करा. आता तयार मिश्रण एका बाटलीत भरा आणि घरात ज्या-ज्या ठिकाणी डास दिसतात, जसे की बेडजवळ आणि खिडक्या आणि दाराभोवती, तिथे तो व्यवस्थित स्प्रे करा. डासांना दूर ठेवण्यासाठी कापूर आणि वॉटर स्प्रे खूप उपयुक्त ठरेल, यामुळे घरात एक छान सुगंधही राहील.
२) संध्याकाळी घरात जाळा कापूर
तुम्ही संध्याकाळी घरात कापूर जाळून डासांना दूर ठेवू शकता. यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात कापूर घ्या आणि तो जाळा. यावेळी घराचे दरवाजे आणि खिडक्या काही वेळ बंद ठेवा. कापराच्या वासामुळे आणि धुरामुळे डास सहज पळून जातील. झोपण्यापूर्वी तुम्ही हा उपाय करून पाहू शकता.
३) कापूर आणि कडुलिंबाच्या तेलाचा दिवा
घरात तुम्ही कापूर आणि कडुलिंबाच्या तेलाचा दिवा लावून डास पळवू शकता. यासाठी दिव्यात कडुलिंबाचे तेल ओता आणि त्यात कापूर बारीक करून त्याची पावडर करून मिसळा. आता त्यात कापसाची वात घाला आणि ती पेटवा. तुम्ही हा दिवा पेटवून खिडकीजवळ ठेवू शकता. यावेळी कडुलिंब आणि कापरच्या वासामुळे डास घरात प्रवेश करणार नाहीत.
पण, हे उपाय करताना कुठेही आग लागणार नाही याची काळजी घ्या.