What To Do During a Heart Attack: आजच्या वेगवान आणि तणावग्रस्त जीवनशैलीत हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) हे एक मोठे आरोग्य संकट बनले आहे. वय, लिंग किंवा जीवनशैली कोणतंही कारण असो; आता तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच हृदयविकाराचा धोका वाढला आहे. चुकीचा आहार, जास्त तेलकट-तुपकट पदार्थ, धूम्रपान, मद्यपान, ताण व झोपेची कमतरता या सगळ्याचा थेट विपरीत परिणाम आपल्या हृदयावर होतो.

जेव्हा शरीरात ट्रायग्लिसराइड (Triglycerides) आणि वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) वाढतं, तेव्हा हे घटक रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर साचू लागतात. या साचलेल्या थराला प्लॅक (plaque) म्हणतात. हाच प्लॅक कालांतरानं रक्तप्रवाह रोखतो आणि जेव्हा रक्त व ऑक्सिजन पुरवठा थांबतो, तेव्हा येतो हृदयविकाराचा झटका!

गेल्या काही वर्षांत अशी अनेक धक्कादायक प्रकरणं समोर आली आहेत, ज्यात रुग्ण अचानक हृदयविकाराचा झटका आल्यावर एकटाच होता. २०२४ ते २०२५ या काळात सुमारे निम्म्या प्रकरणांमध्ये रुग्णांना वेळीच मदत न मिळाल्यानं त्यांना जीव गमवावा लागला. त्यामुळे अशा प्रसंगी स्वतःला सावरून योग्य ती पावलं उचलणं अत्यावश्यक ठरतं.

कार्डिओ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. सी. एम. नागेश सांगतात, “हृदयविकाराचा झटका येण्याआधी शरीर काही संकेत देतं; पण अनेकदा आपण त्यांकडे दुर्लक्षित करतो.” जवळपास दोन-तृतीयांश रुग्णांना मोठा झटका येण्याआधी हलकी लक्षणं जाणवतात, विशेषतः चालताना किंवा थोड्या श्रमानंतर.

हृदयविकाराचा झटका येण्याची सुरुवातीची लक्षणं

छातीमध्ये दाब, जडपणा किंवा कसकस जाणवणं, जो त्रास काही मिनिटं राहतो किंवा अधूनमधून परततो. हा त्रास जबडा, खांदा, हात किंवा पाठीपर्यंत पसरू शकतो. यासोबत श्वास घेण्यात अडचण, मळमळ, चक्कर येणं, अतिप्रमाणात घाम येणं ही लक्षणंसुद्धा असू शकतात. मधुमेही रुग्ण किंवा महिलांमध्ये कधी कधी लक्षणं वेगळी असतात जसे की तीव्र थकवा, अपचन किंवा पाठीच्या वरच्या भागात त्रास.

एकटे असताना हृदयविकाराचा झटका आला, तर काय कराल?

डॉ. नागेश याबाबत सांगतात-

  • ताबडतोब आपत्कालीन सेवेशी संपर्क साधा. स्वतः गाडी चालवू नका.
  • शांत राहा, बसा किंवा आरामदायी स्थितीत झोपा. शरीर हलवू नका.
  • जर डॉक्टरांनी नायट्रोग्लिसरीन औषध दिलं असेल, तर ते निर्देशानुसार घ्या.
  • अॅलर्जी नसेल, तर एक ॲस्पिरिन चावा. त्यामुळे रक्तात गुठळ्या होण्याची प्रक्रिया मंदावते.
  • जिथे असाल, तेथील दरवाजा उघडा ठेवा आणि हळूहळू, खोल श्वास घ्या. त्यामुळे भीती वा दडपण कमी होते आणि हृदयाला ऑक्सिजन मिळतो.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी उपाय

  • संतुलित आहार घ्या. फळं, भाज्या, संपूर्ण धान्य व ओमेगा-३युक्त पदार्थ खा.
  • धूम्रपान आणि मद्यपान टाळा.
  • दररोज किमान ३० मिनिटं व्यायाम करा.
  • पुरेशी झोप घ्या आणि ताण कमी ठेवा.
  • नियमितपणे रक्तशर्करा, कोलेस्ट्रॉल व रक्तदाब तपासा.

लक्षात ठेवा : हार्ट अटॅक ही वैद्यकीय आणीबाणी आहे. तेव्हा वेळीच ती ओळखलीत, तर योग्य कृतीद्वारे तुम्ही स्वतःचं जीव वाचवू शकता. शहाणपणाची काही पावलं उचलली, तर मृत्यूच्या दारातूनही परत येणं शक्य आहे.