कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर संपूर्ण देशाच्या राजकीय पटलावर बऱ्याच हालचाली झाल्याचं पाहायला मिळालं. ज्यानंतर अनेकांनीच या राज्याविषयी चर्चा करण्यास सुरुवात केली. कर्नाटकच्या कलाविश्वापासून ते या राज्यातील पर्यटन स्थळांपर्यंत प्रत्येक गोष्टीविषयी जाणून घेण्यासाठी बऱ्याचजणांनी सोशल मीडियाचा आधार घेतला. चला तर मग सध्या राजकीय कारणांमुळे चर्चेत असणाऱ्या या राज्यातील काही महत्त्वाच्या घटकांवर एक धावती नजर टाकूया…
वाचा : जेव्हा चहा विक्रेत्याने पहिल्यांदाच आपल्या मुलांना नेलं मॅकडोनल्डमध्ये
जोग फॉल्स-
अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या या धबधब्याच्या पाण्याचा वापर कर्नाटकमध्ये वीजनिर्मितीसाठी केला जातो. भारतातील हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच धबधबा आहे. अमुक एका ठिकाणाहूनच नव्हे तर, डोंगराच्या बऱ्याच कपाऱ्यांतून या धबधब्याचा प्रवाह वाहतो. या धबधब्याविषयी आणखी एक रंजक गोष्ट सांण्यात येते की, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी चांदीने भरलेलं एक जहाज या ठिकाणी उलटलं होतं. ज्यामधून जवळपास ४८ टन चांदी बाहेर काढण्यात आली होती.
चन्नापटना खेळणी-
भारतामध्ये विविध ठिकाणी मिळणारी लाकडाची खेळणी बरीच प्रसिद्ध आहेत. या लाकडाच्या खेळण्यांसाठीही कर्नाटक ओळखलं जातं. विविध प्रकारच्या बाहुल्या, प्राणी, गाड्या या गोष्टींची लाकडापासून तयार करण्यात आलेली प्रतिकृती म्हणजे बच्चेकंपनीच्या जिव्हाळ्याचा विषय. त्याशिवाय घरात शोभेच्या वस्तू ठेवण्यासाठीही या खेळण्यांना पसंती दिली जाते. टिपू सुलतानच्या काळापासून कर्नाटकात ही खेळणी बनवण्यात सुरुवात करण्यात आली होती.
हुळी मंदिर-
साधारण १० व्या शतकापासून कर्नाटकमधील बेळगावमध्ये हे मंदिर उभं आहे. सध्याच्या घडीला या मंदिराच्या बऱ्याच भागाचं नुकसान झालं असलं तरीही पुरातत्व विभागाकडून या मंदिराचं जतन करण्यात येत आहे.
मंगळुरूचे चविष्ट खाद्यपदार्थ-
दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती अनेक खवैय्यांच्या जीभेचे चोचले पुरवते. त्यातही मंगळुरूच्या चविष्ट खाद्यपदार्थांची बात काही औरच. ओल्या नारळाचा इथल्या खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. ज्यामुळे एक वेगळीच आणि जीभेवर तरळणारी चव खवैय्यांच्या मनाचा आणि भुकेचा ठाव घेते. कोरी रोटी, नीर डोसा, पिट रोड, दुकरा मांस, खली हे इथले काही प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहेत. त्यामुळे कर्नाटक हे भटकंतीसोबतच लज्जतदार चवीसाठीही ओळखलं जातं हे खरं.
हंपी-
पर्यटक किंवा भटकंतीचं प्रचंड वेड असणाऱ्यांच्या विश लिस्टमध्ये एका ठिकाणाचा आवर्जून उल्लेख केला जातो. ते ठिकाण म्हणजे हंपी. वर्षानुवर्षांपासूनच्या वास्तूकलेचा, स्थापत्यशात्राचा उत्तम नमुना पाहण्यासाठी अनेकांचेच पाय हंपीकडे वळतात. कर्नाटकात होणारा हंपी उत्सवही बराच प्रसिद्ध आहे. त्यामुळे तुमच्या विशलिस्टमध्ये हंपीचा समावेश नसेल तर या ठिकाणाचं नाव लगेचच त्यात समाविष्ट करा.