कंटाळा आलाय, काही सुचत नाहीये किंवा तुमचा आवडता कार्यक्रम बघत असताना जे विनाकारण चर्वण केले जाते, त्याने तुमच्याही नकळत तुमचे वजन वाढत असते. गरज नसताना, पोट भरलेले असतानाही अतिरिक्त पदार्थ खाण्यालाच आपण अतिखाणे किंवा ‘ओव्हर इटिंग’ म्हणतो. मात्र, नव्या वर्षात तुमचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी, अशा चुका टाळण्याचा किंवा सुधारण्याचा प्रयत्न करा. ‘अनेकदा विनाकारण अति खाल्ल्याने आपल्याला गॅस, पोटदुखी, मळमळ, आळस, जळजळ, कंटाळा येणे यांसारख्या गोष्टींचा त्रास होऊ शकतो. त्यासोबतच ही सवय तुमच्या भूक लागण्याच्या प्रक्रियेत बदल करून, वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरू शकते, अशी माहिती क्लिव्हलँड क्लिनिकने [Cleveland Clinic] दिल्याचे एनडीटीव्हीच्या एका लेखातून मिळाली आहे.

अशा सवयी कितीही झाले तरी एका रात्रीत बदलता येत नाहीत. त्यासाठी तुम्हाला स्वतःला कष्ट करून, आपले मन आणि जीभ यांच्यावर ताबा ठेवणे गरजेचे असते. पुढील पाच सवयींपैकी तुम्हाला कोणतीही सवय असल्यास, ती टाळण्यासाठी काय करावे ते पाहा.

अतिखाण्याच्या पाच सवयी आणि उपाय

१. टीव्ही बघत खाणे/जेवणे

जेवणाचे ताट समोर तसेच ठेवून, आपण जेवताना काय पाहावे हे लॅपटॉपवर शोधत असतो. किंवा जर टीव्ही समोर असेल, तर कार्यक्रम सुरू असताना अर्धे लक्ष समोर काय घडत आहे हे बघण्यात असते. अशा परिस्थितीत आपण किती जेवलो आहोत हे पटकन समजत नाही. त्यामुळे अनेकदा आपण गरजेपेक्षा जास्त जेवण किंवा फुटकळ पदार्थांचे सेवन करतो. हे टाळण्यासाठी काय करावे?

हेही वाचा : हिवाळ्यात वजन ते पचन दोघांचीही काळजी घेतील ही सहा ‘फळं’! काय आहेत उपयुक्त टिप्स पाहा….

सोपे आहे. जेवताना टीव्ही कार्यक्रम पाहणे टाळावे. सुरुवातीला असे करणे अवघड होईल; मात्र असे केल्याने तुम्ही काय आणि किती जेवत आहात यावर तुमचे अचूक लक्ष राहील. परिणामी योग्य प्रमाणात अन्नपदार्थ खाल्ले जातील. तुम्हाला याची सवय होण्यासाठी सुरुवातीला मागे गाणी लावली तरीही चालेल; मात्र कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम बघणे टाळावे.

२. ताण-तणाव असताना खाणे

कुठल्या गोष्ट वा परिस्थितीचा जर तुम्हाला ताण येत असेल, तर अशा वेळेस शरीरात काही ठरावीक हार्मोन्सची पातळी वाढल्याने तुम्हाला गोड, चटपटीत किंवा अधिक फॅट्स असणारे पदार्थ खाण्याची इच्छा होते, अशी माहिती क्लिव्हलँड क्लिनिकने दिल्याचे एनडीटीव्हीच्या एका लेखातून मिळते.

यावर उपाय म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कोणत्या गोष्टीचा ताण आला आहे याकडे लक्ष देऊन, त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. एकटे असलात, तर दीर्घ श्वासोच्छ्वास करा. जमल्यास फेऱ्या मारा किंवा जवळच्या व्यक्तीसोबत बोलून बघा. त्यामुळे तुम्हाला नकळत तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि विनाकारण खाण्याकडे तुमचे लक्ष जाणार नाही.

३. कंटाळा आल्यावर काहीतरी खाणे

‘कंटाळा आलाय, काहीतरी खावंसं वाटतंय’ हे वाक्य तर दिवसातून चार-पाच वेळा सहज बोलले जात असते आणि शेवटी आपण चॉकलेट, वेफर्ससारखे तेलकट, गोड, प्रक्रिया केलेले पदार्थ खातो. त्यामुळे आपल्याला तात्पुरता आनंद मिळतो आणि आपला मूड ठीक होतो. मात्र, असे वारंवार केल्याने कधी तुमचे वजन वाढते हे तुम्हालाही समजत नाही.

असे होऊ नये यासाठी कंटाळा आल्यावर शरीराची थोडी हालचाल करा. फेऱ्या मारा, पाणी प्या, लक्ष विचलित करण्यासाठी तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींचा आधार घ्या. परंतु, तेलकट, गोड पदार्थ खाणे टाळा.

हेही वाचा : डबे-बाटल्यांवरील चिकट लेबलचा वैताग आलाय? काही मिनिटांत निघून जातील; या पाच उपयुक्त हॅक्स पाहा…

४. घरापेक्षा बाहेर अधिक फुटकळ खाणे

आपण जेव्हा बाहेर काही खायला जातो तेव्हा,विनाकारण दोन गोष्टी जास्त मागवल्या जातात. तुमचे पोट गच्च भरलेले असले तरी शेवटी आइस्क्रीम किंवा गोडाच्या पदार्थासाठी हमखास जागा केली जाते. सार्वजनिक आरोग्य पोषणाच्या [Public Health Nutrition] प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासावरून, व्यक्ती घरी बनवलेल्या अन्नपदार्थांपेक्षा हॉटेल्समध्ये अधिक प्रमाणात पदार्थांचे सेवन करतात. नेहमीपेक्षा २०० कॅलरीज जास्त खाल्ल्या जातात, असे समजते.

त्यावर उपाय म्हणजे गरज नसताना बाहेरचे खाणे टाळावे. असे करणे शक्य नसल्यास, काय आणि किती खात आहोत यावर काटेकोर लक्ष ठेवा. पोट भरल्यानंतर विनाकारण कोणतेही खाद्यपदार्थ खाऊ नयेत. तसेच जमेल तितके घरीच शिजवलेल्या सकस पदार्थांचे सेवन करण्यास प्राधान्य द्यावे.

५. भराभर पदार्थ खाणे

एखाद्याचे दोन घास खाऊन होईपर्यंत समोरच्या व्यक्तीचे संपूर्ण जेवण झालेले असते. तुम्हीही असे करीत असाल, तर ही टीप तुमच्यासाठी. अनेकदा सवय असली तरीही भराभर जेवण्याच्या नादात काही अन्नपदार्थ व्यवस्थित चावले जात नाहीत. किंवा तुम्हाला कुठेतरी जायचे असते आणि त्या नादात एकापाठोपाठ एक असे घास खाल्ले जातात. असे करीत असताना नकळत तुमच्याकडून प्रमाणापेक्षा जास्त आहार घेतला जाण्याची शक्यता असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, असे बिलकूल करू नका. प्रत्येक घास हा व्यवस्थित चावला गेला पाहिजे. त्यामुळे जेवणाचा वेग थोडा कमी करून, प्रत्येक घासाकडे लक्ष देऊन तो चावून खावा. असे केल्याने तुम्हाला पोट भरले आहे की नाही हे समजणे सोपे जाईल.