वैद्य प्रभाकर शेंडय़े – drshendye@gmail.com
आयुर्वेद म्हणला की नाडी परीक्षा हे एक समीकरण बनले आहे. अनेक वेळा रुग्ण काही न बोलता हात पुढे करतात आणि म्हणतात नाडी बघा, म्हणजे तुम्हाला सगळे कळेलच. नुसती नाडी बघून सर्व रोग निदान होते का? नाडी म्हणजे नक्की काय? हे आपण आज पाहू.
सर्वप्रथम आयुर्वेदाच्या तीन मोठय़ा ग्रंथांमध्ये चरक सुश्रुत व अष्टांग हृदय या संहितामध्ये नाडी परीक्षेचा उल्लेख आलेला नाही. नंतर आलेल्या १३ व्या शतकातील शारंगधर संहितामध्ये याचा प्रथम उल्लेख येतो. १७व्या शतकातील योग रत्नाकर ग्रंथामध्ये या विषयी विस्तृत माहिती आली आहे. याशिवाय काही नाडी परीक्षेवर ग्रंथ नंतरच्या काळात आले आहेत, जसे रावणकृत नाडी संहिता.
* नाडी परीक्षा विधि :
शक्यतो रिकाम्या पोटी सकाळच्या वेळी नाडी परीक्षा केली जाते. रुग्णाला समोर बसवून त्याचा हाताच्या अंगठय़ाखाली २ बोटे सोडून वैद्य नाडी तपासतो.
यामध्ये तर्जनी मध्यमा व अनामिका बोटांना अनुक्रमे तीन दोषांची वात, पित्त व कफ नाडी समजते.
नाडी तपासताना त्याची गती, तीव्रता, बोटाला जाणवणारा स्पर्श इत्यादी विविध गोष्टींचा विचार करून दोषांची अवस्था समजते.
नाडी परीक्षणामध्ये विविध गती वर्णन केल्या आहेत. जसे सर्प, हंस ज्यामुळे दोषांची अवस्था समजू शकते.
रोगाचे निदान करताना दोषांची अवस्था किंवा त्या रोगाची तीव्रता ठरवताना तसेच औषध दिल्यानंतर होणारी सुधारणा समजण्यासाठी नाडी परीक्षेचा चांगला उपयोग होतो.
* हे लक्षात घ्या : नाडी हे रोग जाणण्यासाठीच्या अनेक साधनांपैकी एक साधन आहे. उत्तम नाडी परीक्षा करायला वैद्यला अनेक वर्षे अभ्यास व अनुभवाची जोड लागते. केवळ नाडी परीक्षा करून सर्व रोगनिदान होत नाही. त्यासाठी अजूनही परीक्षा कराव्या लागतात. अनेक वेळा नाडी परीक्षा न करताही उत्तम निदान केले जाऊ शकते. नाडी परीक्षेशिवाय आयुर्वेदीय निदान व उपचार होत नाहीत हा गैरसमज आहे.