१. पाणी गाळून घेणे – वॉटर प्युरीफायरमध्ये पाणी गाळले जाते. त्याचप्रमाणे स्वच्छ कापड किंवा अतिशय बारीक जाळीची गाळणी यांनी पाणी गाळून घेतल्यास ते स्वच्छ होते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात या पद्धतीचा हमखास वापर करावा. मी चागंल्या सोसायटीमध्ये राहतो त्यामुळे आमच्याकडे चांगले पाणी येते असे वाटत असले तरीही पाणी कायम गाळून मगच प्यावे.
२. उकळणे – पावसाळ्याच्या दिवसात पाणी उकळून गार करुन प्यावे असे डॉक्टरही अनेकदा सांगतात. उकळल्यामुळे पाण्यातील जीवजंतू मरुन जातात आणि पाणी शुद्ध होते. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत कुटुंबातील सर्वांनी उकळलेले पाणी प्यावे.
३. तुरटी फिरवणे – तुरटी फिरवून पाणी शुद्ध करणे ही अतिशय पारंपरिक पद्धत आहे. भरलेल्या पाण्याच्या भांड्यात तुरटी फिरवल्यास पाण्यातील गाळ खाली बसतो आणि पाणी स्वच्छ होते. मात्र तुरटी फिरवली असली तरीही हा पाणी स्वच्छ करण्याचा म्हणावा तितका खात्रीशीर उपाय नसल्याने हे पाणी गाळून आणि उकळूनच प्यावे.
४. नळाला फडके किंवा फिल्टर बसविणे – पावसाळ्याच्या दिवसात नळाला काहीसे मातकट आणि अशुद्ध पाणी येते. त्यामुळे हे पाणी भरतानाच काही प्रमाणात स्वच्छ व्हावे यासाठी नळाला कापड बांधावे किंवा गाळणे लावावे. याशिवाय हल्ली बाजारात नळाला लावण्यात येणारी वेगवेगळी फिल्टर्स उपलब्ध असतात. त्यांचा वापरही फायदेशीर ठरु शकतो. यामुळे पाण्यातील सौम्य प्रकारच्या जंतूंचा धोका कमी होण्यास मदत होते.