हळदीतील क्युरक्युमिन या रसायनाच्या मदतीने योग्यप्रकारे उपचार केले तर त्यामुळे हाडातील कर्करोगाची वाढ रोखता येते असे अलीकडच्या संशोधनात म्हटले आहे. भारतीय वैज्ञानिकांसह इतरांनी हा दावा केला आहे. ही नवी पद्धत वॉशिंग्टन स्टेट विद्यापीठात विकसित करण्यात आली असून त्यात हाडातील कर्करोग पेशींना अटकाव करून निरोगी पेशींच्या वाढीस उत्तेजन मिळते. याचा थेट कर्करोगावर मुख्य उपचार म्हणून उपयोग करण्यास अजून वेळ असला तरी कर्करोगाच्या उपचारानंतर तो पुन्हा वाढू नये यासाठी त्याचा आता उपयोग केला जाऊ शकतो.

ऑस्टिओसारकोमा या कर्करोगाच्या वाढीत मुलांचे मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त असून त्यात या उपचारांचा वापर करता येईल असा दावा वैज्ञानिकांनी एसीएस अ‍ॅप्लाइड मटेरियल्स अँड इंटरफेसेस या नियतकालिकात केला आहे. तरुण रुग्णांमध्ये हाडाच्या कर्करोगाचे उपचार करताना केमोथेरपीची तीव्र मात्रा दिली जाते, शस्त्रक्रियेनंतर यात अनेक दुष्परिणाम असतात ते टाळण्यासाठी हळदीचा उपयोग होतो. आशियायी देशातील मसाल्याच्या पदार्थात हळदीचा समावेश असून अनेक प्रकारचे कर्करोग रोखण्याची ताकद हळदीत असते असे संशोधकांचे मत आहे. वॉशिंग्टन स्टेट विद्यापीठातील सुश्मिता बोस यांनी सांगितले की, हळदीतील नैसर्गिक संयुगांचे  अनेक उपयोग आहेत. हळदीपासून मिळवलेल्या जैवरेणूपासून किफायतशीर पर्यायी औषधे तयार करता येतात. तोंडावाटे ही संयुगे घेतली तर ती शरीरात शोषली जात नाहीत. स्कॅफोल्ड मध्येच क्युरक्युमिन मिसळून त्याचा सतत पुरवठा करणे शक्य आहे. त्यामुळे शस्त्रक्रि येनंतर मदत होते. यामुळे ऑस्टिओसारकोमाच्या पेशींची वाढ ९६ टक्के रोखली जाते.