Yellow Fruits for Cholesterol: आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आहाराच्या सवयींमध्ये मोठा बदल झाला आहे. फास्टफूड, तळलेले पदार्थ, तेलकट जेवण आणि व्यायामाचा अभाव यांमुळे लोकांना अनेक आजारांनी ग्रासले आहे. त्यात सर्वांत धोकादायक समस्या म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढणे. शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त झालं की, त्याचा थेट फटका हृदयाला बसतो. परिणामी हार्ट अटॅक, स्ट्रोक व उच्च रक्तदाब यांचा धोका अनेक पटींनी वाढतो; पण काळजी करू नका. कारण- आयुर्वेदिक व युनानी वैद्यक तज्ज्ञ डॉ. सलीम जैदी यांनी कोलेस्ट्रॉलला नैसर्गिकरीत्या आटोक्यात ठेवण्यासाठी तीन खास पिवळ्या रंगाची फळं शिफारस केली आहे.

डॉ. जैदी यांच्या मते, शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात

वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) जे हळूहळू रक्तवाहिन्यांमध्ये साठतं आणि धमन्या ब्लॉक करतं.

चांगलं कोलेस्ट्रॉल (HDL) जे शरीरासाठी फायदेशीर मानलं जातं.

जेव्हा वाईट कोलेस्ट्रॉल जास्त प्रमाणात जमा होतं, तेव्हा हृदयविकाराचं मोठं संकट उभं राहतं. पण, योग्य असा आहार घेतल्यास त्यावर सहज मात करता येते. पाहूया कोणती आहेत ती ३ जादुई पिवळी फळं, जी हृदयाचं रक्षण करतील…

१) केळे

केळ्यात भरपूर प्रमाणात फायबर आणि पोटॅशियम असतं. हे घटक रक्तदाब कमी करण्यास आणि धमन्यांमधील वाईट कोलेस्ट्रॉल बाहेर टाकण्यास मदत करतात. त्याशिवाय केळ्यातील विद्राव्य तंतुमय घटक पचनक्रिया सुधारतात आणि पोटाची तब्येत चांगली ठेवतात. रोज एक केळं खाल्ल्यास भूकही आटोक्यात राहून, आपल्याला शरीरही हलकं असल्याच्या भावनेमुळे बरं वाटतं.

२) आंबा

सर्वांत लोकप्रिय फळ म्हणजे आंबा. पण, आंबा फक्त चवीला गोड नाही, तर तो हृदयासाठीही वरदान आहे. आंब्यामध्ये बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन सी हे घटक मुबलक प्रमाणात असतात. हे घटक रक्ताभिसरण सुधारतात, वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि हृदयविकाराचा धोका घटवतात. दररोज आंब्याचा समावेश केल्यानं शरीर ताजेतवानं राहतं आणि त्यामुळे रोगप्रतिकार शक्तीही वाढते.

३) अननस

अननसामध्ये असलेलं खास एन्झाइम ब्रोमेलिन रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अत्यंत परिणामकारक मानलं जातं. त्याशिवाय अननस फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स यांनी परिपूर्ण आहे. हे फळ खाल्ल्यानं पचनक्रिया सुधारते, पोट हलकं राहतं व शरीरातील विषारी घटक सहज बाहेर टाकले जातात.

थोडक्यात, डॉ. सलीम जैदी सांगतात की, रोजच्या आहारात ही तीन पिवळी फळं समाविष्ट केल्यास फक्त कोलेस्ट्रॉलच नाही, तर हृदयविकाराचा धोक देखील मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. तर मग आता उशीर कशाला? हृदयाचं रक्षण आणि आरोग्यदायी आयुष्य जगण्यासाठी केळं, आंबा व अननस ही तीन फळं खाण्याची सवय आजपासूनच अंगीकारा.