महाजिवाणूंना मारण्याची क्षमता
ब्रिटिश वैज्ञानिकांनी आईच्या दुधापासून औषधरोधक जिवाणूंशी सामना करणारे प्रतिजैविक तयार केले आहे, महाजिवाणूंच्या विरोधात सामना करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. महाजिवाणूंमुळे आधुनिक वैद्यकशास्त्राची पीछेहाट होण्याची भीती ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी वर्तवली होती. ‘द टाइम्स’मधील बातमीनुसार प्रतिजैविक रोधक जिवाणूंचा सामना करण्यासाठी पंतप्रधान कॅमेरून यांनी एक पथक स्थापन केले होते. त्यांच्या मते महाजिवाणूंना आळा घातला नाही तर २०५० पर्यंत १ कोटी लोक मरतील व ७०० अब्ज पौंडांचा खर्चही होईल.
सध्याच्या जिवाणू संसर्गामुळे दर वर्षी सात लाख लोक मरतात. त्यात ब्रिटनमधील संख्या १० हजार आहे. नेहमीच्या पारंपरिक प्रतिजैविकांना जिवाणू दाद देत नाहीत. त्यांच्याविरोधात ते संरक्षक फळी तयार करतात. नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीने या महाजिवाणूंच्या सेकंदात चिरफळ्या उडवणारे औषध तयार केले आहे. त्याचा उपयोग सिकल सेल अॅनिमियासारख्या जनुकीय रोगांवरही होणार आहे.
त्यात पेशींच्या डीएनएत बदल करावे लागतील, असे संशोधकांचे म्हणणे आहे. वैज्ञानिकांनी मानवी पेशीत वेगाने पसरणाऱ्या जिवाणूंमध्ये कृत्रिम विषाणूच्या मदतीने एक प्रथिन सोडले. या औषधांमुळे ई कोलाय व स्टॅफिलोकॉकल ऑरस या जिवाणूंना मारले जाते. नेहमीच्या प्रतिजैविकांपेक्षा हे औषध यशस्वी ठरले आहे, रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीच्या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. मुख्य वैद्यकीय अधिकारी डेम सॅली यांनी अलीकडेच सांगितले होते की, लोकांनी प्रतिजैविकांचा अतिवापर टाळला पाहिजे अन्यथा आपल्याला दर दहा वर्षांनी सरासरी दहा प्रतिजैविके शोधावी लागतील.
(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)