Dairy consumption: दूध, दही, पनीर व चीज यांसारखे दुग्धजन्य पदार्थ पोषणाचा एक उत्तम स्रोत मानले जातात. दुग्धजन्य पदार्थ पोषक तत्त्वांनी समृद्ध असले तरी जास्त प्रमाणात सेवन केल्याने जळजळ, हार्मोनल असंतुलन आणि कर्करोगाचा धोका वाढू शकतो.अशा परिस्थितीत आपण आपल्या आहारात बदल करणे, वनस्पती-आधारित पर्यायांचा अवलंब करणे, संतुलित आहार आणि सक्रिय जीवनशैलीने शरीर निरोगी ठेवणे चांगले.
दुबईस्थित ऑन्कोलॉजी तज्ज्ञ डॉ. शर्मीन याकीन यांच्या मते, दूध आणि त्याचे पदार्थ नेहमीच कॅल्शियम आणि प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत मानले गेले आहेत. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या आहारात दूध, दही, पनीर किंवा चीज कोणत्या ना कोणत्या स्वरूपात असते; परंतु दुग्धजन्य पदार्थांचे जास्त सेवन केल्याने कर्करोगाचा धोका वाढू शकतो. डॉ. शर्मीन यांच्या मते, दुग्धजन्य पदार्थांचा आपण जितका विचार करतो, तितके ते आरोग्यदायी नाहीत. उलट ते शरीरात जळजळ वाढवतात, जे अनेक प्रकारच्या कर्करोग आणि आजारांचे मूळ आहे.
दुग्धजन्य पदार्थ आणि कर्करोगाचा संबंध
डॉ. शर्मीन याकिन यांच्या मते, गाय, म्हशी किंवा बकरीच्या दुधापासून बनवलेले दुग्धजन्य पदार्थ शरीरात जळजळ वाढवतात. दुग्धजन्य पदार्थ हे एक दाहक अन्न आहे. त्याचा अर्थ असा की दूध, दही आणि चीजसारख्या उत्पादनांमुळे शरीरात जळजळ होते आणि ही जळजळ कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा पाया आहे. दुग्धजन्य पदार्थांचा परिणाम सर्वांना होतो. तुम्हाला आजार असो वा नसो, जास्त प्रमाणात दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने जळजळ वाढते.
प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कोणत्या घटकांमुळे वाढतो?
अनेक अभ्यासांनुसार, दुग्धजन्य पदार्थांचे जास्त सेवन केल्याने पुरुषस्थ ग्रंथीच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. डॉ. शर्मीन यांच्या मते, दररोज दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या पुरुषांमध्ये पुरुषस्थ ग्रंथीच्या कर्करोगाची प्रकरणे आढळून आली आहेत.
कॉटेज चीज असो, प्रक्रिया केलेले चीज असो, दही असो, दूध असो किंवा क्रीम असो, त्यांच्यापासून जास्त धोका असतो. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, जास्त प्रमाणात दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने शरीरात IGF-1 नावाचा हार्मोन वाढतो, जो कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस उत्तेजन देऊ शकतो.
कर्करोग टाळण्यासाठी काय करावे
डॉ. शर्मीन याकिन यांच्या मते, दुग्धजन्य पदार्थांऐवजी दाहकविरोधी पर्यायांचा वापर करावा. सोया, बदाम, ओट किंवा नारळाचे दूध यांसारखे वनस्पती-आधारित दूध हे चांगले पर्याय आहेत. त्याव्यतिरिक्त हिरव्या पालेभाज्या, तीळ, बदाम व नाचणी यातून कॅल्शियम मिळू शकते. प्रथिनांसाठी तुम्ही डाळी, टोफू, क्विनोआ व चिया बियाणे खाऊ शकता. तसेच, प्रक्रिया केलेले अन्न टाळा.