शीतपेये, कोला, सोडा आणि सॉफ्टड्रिंक्स ही आजच्या फास्ट जीवनशैलीची एक अविभाज्य अंग बनली आहेत. मध्यमवर्गीय घरांमध्येदेखील शीतपेयांच्या लिटर दीड लिटरच्या बाटल्या फ्रीजमध्ये ठेवण्याचा प्रघात सुरू झाला आहे. ‘आज काही तरी वादळी करू या’ म्हणून तरुणवर्ग शीतपेयांच्या बाटल्या आणि कॅन्स मोठ्या जोमाने घोटतोय. आंतरराष्ट्रीय साखळीद्वारे चालवल्या जाणाऱ्या फास्टफूड जॉइंटमध्ये तर खाण्याबरोबर पाण्याऐवजी कोलाच मिळतो. या एकविसाव्या शतकात या पेयांच्या फेसात समस्त लोक न्हाऊन निघणे ही एक ‘इन-थिंग’ बनली आहे. भारतातल्या अग्रगण्य शीतपेयांच्या रासायनिक घटकांचा अभ्यास करणाऱ्या एका शास्त्रीय अहवालानुसार, या शीतपेयांमध्ये शरीरावर विपरीत परिणाम करणाऱ्या अनेक त्याज्या गोष्टी असतात.
शीतपेयात असणारे हानिकारक घटक
आम्ले- शीतपेयांमध्ये सायट्रिक आणि फॉस्फरिक अॅसिड मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे ती आंबट लागतात. रासायनिक पदार्थाची आम्लता ठरवणाऱ्या पी.एच. व्हॅल्यूचा विचार केला, तर या पेयांची पीएच १ ते ३ एवढ्या जास्त प्रमाणात असते. आपल्या प्रसाधनगृहातील कमोडची स्वच्छता करणाऱ्या आम्लाएवढी तीव्र!!
कार्बन-डाय-ऑक्साईड- या पेयांची जी ‘टँगी टेस्ट’ असते, ती त्यात विरघळेल्या कार्बन-डाय-ऑक्साईड वायूमुळेच.
शर्करा- ग्लुकोज, सुक्रोज आणि मक्यापासून बनलेले फ्रुक्टोज अशा अनेकविध रूपात या पेयांमध्ये साखरेची रेलचेल असते. ३०० मिलीलिटरच्या बाटलीमध्ये सुमारे ३५ ग्रॅम म्हणजे ९ चमचे साखर असते. शीतपेयाची एक बाटली गट्टम केल्यावर १४० ते १५० एवढ्या कॅलरीज मिळतात.
मद्यार्क- शीतपेयांच्या रासायनिक चाचणीत प्रत्येक शीतपेयांचे नमुने वेगवेगळ्या परीक्षानळीत घेऊन त्यात आयोडीन, पोटॅशियम आयोडाईड आणि सोडियम हायड्रोक्साईड क्रमाने मिसळून हे मिश्रण उकळत्या पाण्यात ३० मिनिटे तापवले असता परीक्षानळीत मद्यार्काचा अंश सिद्ध करणारा पिवळ्या रंगाचा साका दिसू लागतो. याचा अर्थ भारतात उपलब्ध असलेल्या सर्व शीतपेयांमध्ये मद्यार्काचा अंश असतो. हा निष्कर्ष खूपच धक्कादायक आणि मनाला सुन्न करणारा आहे. याशिवाय फॉस्फेट्ससारखी मूत्रपिंडाला धोकादायक रसायने देखील शीतपेयात सापडतात.
दुष्परिणाम
स्थूलत्व- शीतपेयांमुळे अतिरिक्त १५० कॅलरीज तर मिळतातच, पण एवढ्याच कॅलरीज देणारे अन्नपदार्थ सेवन केल्यावर पोट भरल्याची जी भावना आपल्याला होते, ती या पेयांच्या सेवनानंतर होत नाही. त्यामुळे ती व्यक्ती पुन्हा पोटभर जेवण करतेच. साहजिकच एकुणात अधिक कॅलरीज शरीरात जाऊन वजन वाढते.
मधुमेह व उच्च रक्तदाब- ‘वर्ल्ड ओबेसिटी फेडरेशन’ या स्थूलात्वावर संशोधन करणाऱ्या लंडनमधील जागतिक पातळीवरील संस्थेच्या परिपत्रकानुसार शीतपेयांच्या रोजच्या अतिसेवनामुळे येणाऱ्या स्थूलत्वाचे त्यात मोठे योगदान नक्कीच आहे.
हाडांवर परिणाम- शीतपेयातील आम्लांमुळे हाडे ठिसूळ बनत जातात. त्यामुळे कंबर, पाठ, हातपाय दुखणे असे त्रास तरुणवयात होऊ शकतात.. एका तज्ञांच्या मते शीतपेयाच्या प्रत्येक घोटाने दातांच्या आवरणाची किमान २ टक्के झीज होऊन ते लवकर किडतात आणि पडतात.
इतर विकार- शीतपेयांच्या अतिसेवनामुले सर्दी, खोकला, टॉन्सिलायटिस, अस्थमा, युवतींमध्ये पीसीओएस, वंध्यत्व, तसेच फॉस्फोरिक अॅसिडमुळे मूत्रपिंडांवर परिणाम होतात.
डॉ. अविनाश भोंडवे, फॅमिली फिजिशियन