Does Using Deodorant Or Antiperspirant Increase Breast Cancer Risk : डिओडोरंटचा वापर शरीराची दुर्गंधी कमी करण्यासाठी केला जातो तर अँटीपर्सपिरंटचा वापर शरीराला येणाऱ्या घामावर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जातो. डिओडोरंट हे दुर्गंधी गायब करतात, तर अँटीपर्सपिरंट काही काळासाठी घाम येणे टाळतात. पण सोशल मीडियावर गेल्या काही काळात असा समज पसरला आहे की,” या उत्पादनांच्या वापरामुळे स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) होऊ शकतो. मात्र, यामागे किती तथ्य आहे? चला, तज्ज्ञ काय सांगतात ते जाणून घेऊया.
तज्ज्ञांचं मत (Experts’ Opinion)
जनसत्ताच्या वृत्तानुसार बोरिवली येथील एचसीजी कॅन्सर सेंटरच्या सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि ब्रेस्ट ऑन्कोसर्जन डॉ. भविषा घुगरे यांनी सांगितलं की, “डिओडोरंट किंवा अँटीपर्सपिरंटमुळे स्तनाचा कर्करोग होतो, असा जो समज लोकांमध्ये पसरला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे. हे प्रामुख्याने अफवा आणि चुकीच्या माहितीतून पसरलेलं आहे. वैज्ञानिक पुरावे मात्र काहीतरी वेगळंच सांगतात.”
डॉ. घुगरे सांगतात की,”या उत्पादनांमध्ये वापरले जाणारे अल्युमिनियम कंपाउंड्स आणि पॅराबेन्स या घटकांमुळे लोकांमध्ये भीती निर्माण होते, पण हे घटक कर्करोग निर्माण करतात, असा कोणताही पुरावा नाही.”
अल्युमिनियम कंपाउंड्स म्हणजे काय? (What are Aluminum Compounds?)
अँटीपर्सपिरंटमध्ये अल्युमिनियम सॉल्ट्स असतात, जे घामाचे रंध्र काही काळासाठी बंद करतात. काहींचा समज आहे की शेविंगनंतर हे घटक त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करून स्तनांच्या पेशींमध्ये जमा होतात आणि त्यामुळे कर्करोग होतो. पण संशोधनाने ही धारणा चुकीची ठरवली आहे.”
पॅराबेन्स म्हणजे काय? (What are Parabens?)
पॅराबेन्स हे सौंदर्यप्रसाधने आणि सौंदर्य उत्पादनांमध्ये वापरले जाणारे संरक्षक (Preservatives) आहेत. यात सौम्य एस्ट्रोजेनसारखे गुणधर्म असतात म्हणून काही जण त्याला स्तनाच्या कर्करोगाशी जोडतात. एस्ट्रोजेन हा हार्मोन शरीरात विशिष्ट कार्य करतो (जसे मासिक पाळीचे नियमन, स्तन विकास, हाडांचे स्वास्थ्य इ.).स्ट्रोजेन किंवा पॅराबेन्ससारखे पदार्थ रिसेप्टरशी जुळतात आणि त्यासारखा परिणाम करू शकतात. पण संशोधनानुसार पॅराबेन्सचा प्रभाव फारच सौम्य असतो आणि त्याचा कर्करोगाशी थेट संबंध आढळलेला नाही.
वैज्ञानिक संशोधन काय सांगतं? (What Does Science Say?)
Journal of the National Cancer Institute मध्ये प्रकाशित संशोधनानुसार डिओडोरंट आणि अँटीपर्सपिरंट वापरामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो, असा कोणताही पुरावा नाही. अमेरिकन कॅन्सर सोसायटीचे टेड एस. गन्सलर यांनी सांगितलं आहे की,”या संदर्भात आजपर्यंत कोणतेही ठोस वैज्ञानिक पुरावे आढळलेले नाहीत.”
त्वचेद्वारे शरीरात अल्युमिनियम फारच कमी प्रमाणात प्रवेश करतो आणि शरीर त्याला नैसर्गिकरीत्या बाहेर टाकतं. त्यामुळे त्याचा साठा होण्याची शक्यता नगण्य आहे.
काय काळजी घ्यावी? (How to Stay Safe?)
डिओडोरंट किंवा अँटीपर्सपिरंट वापरामुळे स्तनाचा कर्करोग होतो, असा कोणताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही.
जर तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सरबाबत चिंता वाटत असेल, तर तुमचा कुटुंबातील इतिहास, जीवनशैली, वय, आणि आरोग्य तपासणीची सवय याकडे लक्ष द्या. नियमित तपासणी आणि डॉक्टरांचा सल्ला घेणं हे प्रतिबंधाचं सर्वोत्तम साधन आहे.