हृदयाच्या वाढीशी निगडित दोन प्रथिनांचा शोध

हृदयावर ताण येतो त्याला पॅथॉलॉजिकल हायपरट्रॉफी म्हणतात त्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.

हृदयाच्या वाढीशी निगडित असलेली दोन प्रथिने सापडली असून त्यांचे नियंत्रण केल्यास हृदयरोगांचा मुकाबला करणे सोपे जाणार आहे. ‘

स्पेनमधील हृदयरोग संस्थेचे संशोधन
हृदयाच्या वाढीशी निगडित असलेली दोन प्रथिने सापडली असून त्यांचे नियंत्रण केल्यास हृदयरोगांचा मुकाबला करणे सोपे जाणार आहे. ‘पी ३८ गॅमा’ व ‘पी ३८ डेल्टा’ अशी या प्रथिनांची नावे असून त्यांचा शोध स्पेनमधील सेंटर फॉर कार्डिओव्हस्क्युलर रीसर्च या संस्थेचे ग्वाडालुपे सॅबियो यांनी लावला आहे.
नेचर कम्युनिकेशन्स या नियतकालिकाने म्हटले आहे की, या नव्या संशोधनामुळे हृदयरोगाशी निगडित नवी औषधे तयार करता येतील. काही वेळा हृदयाची जास्त वाढ होते त्यावरही नियंत्रण मिळवता येऊ शकते. सॅबियो यांच्या संशोधक गटाला असे दिसून आले की, पी ३८ गॅमा व पी ३८ डेल्टा या प्रथिनांमुळे डाव्या जवनिकेची वाढ नियंत्रित करता येते आणि याच वाहिनीतून ऑक्सिजनयुक्त रक्त शरीरात खेळवले जात असते. संशोधकांनी उंदरांवरील प्रयोगात असे दाखवून दिले की, ज्या उंदरात ही प्रथिने कमी होती त्यांच्यात हृदयाची वाढ कमी होती. पण ती हृदये योग्य रितीने काम करीत होती व उच्च रक्तदाबासारख्या प्रेरक स्थितीला प्रतिसाद देण्यास मात्र अक्षम होती. हृदय हे जीवनातील प्रत्येक अवस्थेतील गरजा बघून त्यानुरूप होत असते त्यामुळे इतर शरीराशी सुसंगत पद्धतीने ते वाढते, अगदी गर्भारपणातही कार्डिअ‍ॅक हायपरट्रॉफी प्रमाणे त्याची वाढ होते. जास्त व्यायाम किंवा उच्च रक्तदाब, लठ्ठपणा यामुळे हृदयावर ताण येतो त्याला पॅथॉलॉजिकल हायपरट्रॉफी म्हणतात त्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. या शोधामुळे हृदयाच्या पेशी कशा वाढतात यावर नवा प्रकाश पडणार आहे.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Finding two protein linked to heart growth