गुढीपाडव्याशी फक्त सांस्कृतिक, धार्मिक गोष्टीच जोडलेल्या नाहीत तर त्यात निसर्गाचा, पर्यावरणाचाही विचार आहे. आल्हाददायक वसंत ऋतूनंतरचा उन्हाळा बाधू नये, म्हणून वर्षांच्या सुरुवातीलाच कडुनिंबाची पाने खावीत, असे सांगितले आहे. सृष्टी निर्माण केल्यानंतर ब्रह्मदेवाने सृष्टीला चालना दिली तो पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा, असे समजले जाते. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक. त्यामुळे नवीन उद्योगाचा, व्यवसायाचा आरंभ करण्यास हा उत्तम मुहूर्त समजला जातो. यामध्ये नूतन संवत्सराची सुरुवात, म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस हा महत्त्वाचा शुभ मानला जातो. या दिवशी गुढी उभारुन नव्या संकल्पाचा शुभारंभ केला जातो, पण यंदा महाराष्ट्रासह जगभरात सुरू असलेल्या करोना व्हायरसच्या थैमानामुळे करोना व्हायरसला पिटाळून लावू आणि या जागतिक महामारीवर मात करु अशा संकल्पाची गुढी उभारण्याची गरज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्याकडे प्रत्येक संवत्सराला (वर्षांला) नाव दिलेले असते. इतर कोणत्याही कालगणनेत अशा प्रकारे वर्षांला नाव दिलेले दिसत नाही. नवीन शके १९४० या संवत्सराचे नाव विलंबी संवत्सर असे आहे. आपल्याकडे साठ संवत्सरांचे (वर्षांचे) एक चक्र आहे. त्याप्रमाणे ती ६० नावे पुन्हा पुन्हा चक्रगतीप्रमाणे येत असतात. चैत्र महिन्यात भारतीय नूतन वर्षांचा प्रारंभ होतो. याच्याही पाठीमागे गणितीय सिद्धांत आहेत. आपल्या राशिचक्राची सुरुवात मेष राशीपासून होते. चैत्र महिन्यात सूर्य मेष राशीत प्रवेश करतो. म्हणून चैत्र हा वर्षांतील पहिला महिना आहे. या चैत्र महिन्यात पौर्णिमेला चित्रा नक्षत्रात चंद्र असतो. म्हणून त्या नक्षत्रावरून चैत्र हे नाव पडले आहे. तेव्हा चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. हाच वर्षांरंभाचासुद्धा दिवस असल्यामुळे खगोलीय गणितानुसारदेखील या दिवसाला विशेष महत्त्व आहे. शालिवाहन शकाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते, त्याबाबतची कथा अनेक वर्षांपासून सांगितली जाते. शालिवाहन नावाचा कुंभाराचा मुलगा होता. त्याने मातीचे सैन्य तयार केले व त्यावर पाणी शिंपडून त्या सैन्याला सजीव केले. या सैन्याच्या मदतीने शत्रूचा पराभव केला, या कथेचा लाक्षणिक अर्थ असा घेतला जातो की, दगड-मातीसारख्या चेतनाहीन, पौरुषहीन बनलेल्या त्या काळातील लोकांमध्ये शालिवाहनाने चैतन्याचा मंत्र भरला, उत्साहाने प्रेरित झालेल्या त्या सैन्याने मर्दुमकी गाजवली. शत्रूवर विजय मिळविला. सद्विचार, वीरश्री यांसारखे गुण आपल्यातच असले तरी काही वेळा त्यांना प्रेरित करावे लागते, हे काम शालिवाहनाने केले.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gudi padwa 2020 significance and importance of gudi padwa 2020 sas
First published on: 25-03-2020 at 08:37 IST