फॅटी लिव्हर ही एक सामान्य समजली जाणारी समस्या आहे. यामध्ये लिव्हरमध्ये अनावश्यक फॅट जमा होते. लिव्हर म्हणजेच यकृत हा शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. ते डिटॉक्सिफिकेशन, चयापचय कार्यांमध्ये भूमिका बजावते आणि चरबी तसंच कार्बोहायड्रेट्ससाठी एक भांडार म्हणून काम करते. लिव्हरवर कुठलाही परिणाम झाल्यास त्याचा थेट परिणाम तुमच्या एकूण आरोग्यावर होतो. खराब आहार आणि बिघडणारी जीवनशैली फॅटी लिव्हर वाढण्याला चालना देते. लिव्हरमध्ये फॅट जमा झाल्यामुळे लिव्हरचे कार्य कमी होते, त्यामुळे शरीरात विषारी पदार्थ वाढू शकतात आणि चयापचय असंतुलन होऊ शकते.
फॅटी लिव्हरची लक्षणे
- जलदगतीने वजन कमी होणे
- गडद मूत्र
- असामान्य किंवा गडद रंगाचे शौच
- लिव्हरभोवती सौम्य सूज किंवा वेदना
फॅटी लिव्हरची वाढ टाळण्यासाठी आणि लिव्हरचे आरोग्य राखण्यासाठी निरोगी जीवनशैली स्वीकारणे आवश्यक आहे. यामध्ये संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि हायड्रेशन यांचा समावेश आहे. कानपूरच्या गॅस्ट्रो लिव्हर हॉस्पिटलचे डॉ. व्ही. के. मिश्रा यांनी दि इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, काही फळे लिव्हरमधील चरबी कमी करण्यास मदत करू शकतात. ही फळे फॅटी लिव्हर सुधारण्यासाठी आणि त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. अशा फळांबाबत अधिक माहिती जाणून घेऊ…
लिंबूवर्गीय फळे
संत्री, गोड लिंबू आणि लिंबू यांसारखी लिंबूवर्गीय फळे व्हिटॅमिन सी ने समृद्ध असतात. ती रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि लिव्हरचे विषारी पदार्थांपासून संरक्षण करतात. व्हिटॅमिन सी लिव्हरच्या डिटॉक्सिफिकेशन प्रक्रियेत मदत करते आणि फॅटी लिव्हरचा धोका कमी करते.
सफरचंद खा
सफरचंदामध्ये विरघळणारे फायबर उत्तम असते. ते लिव्हरमधील फॅट कमी करण्यास आणि डिटॉक्सिफिकेशन सुधारण्यास मदत करते. दररोज सफरचंद खाल्ल्याने लिव्हरचे आरोग्य सुधारू शकते.
पपई
पपईमध्ये जीवनसत्वे आणि एंझायम्स भरपूर प्रमाणात असतात. ते पचनासाठी मदत करते आणि लिव्हरवरील भार कमी करते. जर तुम्हाला फॅटी लिव्हर असेल तर पपई खाल्ल्याने लिव्हरचे कार्य सुधारते.
किवी
किवी हे पैष्टिकतेने समृद्ध फळ आहे. यामध्ये जीवनसत्वे आणि खनिजे यांचे मिश्रण असते. ते लिव्हरचे आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. तसंच लिव्हरवरील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करते.
बेरी खा
बेरीजमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. नियमित सेवनाने लिव्हरचे आरोग्य सुधारते, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. तसंच ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो. बेरीज खाल्ल्याने लिव्हरमधील फॅट कमी होण्यास मदत होते आणि लिव्हरची जळजळ नियंत्रित होते.
ब्लूबेरी
ब्लूबेरी हे अँटीऑक्सिडंट्सचे पॉवरहाऊस मानले जाते. ते लिव्हरमधील जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करते. नियमित ब्लूबेरीचे सेवन केल्याने लिव्हरमधील फायब्रोसिसचे प्रमाण कमी होते आणि लिव्हरचे वजन नियंत्रित होते असे अभ्यासातून आढळले.