Does alcohol affect sleep cycle : मद्यपान आरोग्यासाठी चांगले नाही, हे आपल्याला माहीत आहे. विज्ञान आणि वैद्यकीय तज्ज्ञांनीही याला नेहमी सहमती दर्शवली आहे. लोकप्रिय न्यूट्रिशनिस्ट पूजा मखिजा (Pooja Makhija) यांनी इन्स्टाग्रामला एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सांगितले की मद्यपानामुळे होणारा हँगओव्हर आपल्या झोपेच्या वेळापत्रकात कसा अडथळा आणतो? “खरंच मद्यपान केल्यानंतर दुसऱ्या दिवशी गोंधळ उडतो का? तुम्ही मद्यपान करून ‘फेक स्लीप’साठी पैसे देत आहात. मद्य तुम्हाला शांत करते, तुमच्या शारीरिक क्रियांमध्ये गोंधळ घालते, मद्यपानामुळे तुम्हाला खूप थकवा येतो, मूड सतत बदलतो आणि प्रचंड क्रेव्हिंग होते.” असे त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय. जेव्हा तुम्ही दीर्घकालीन मद्यपान करायाचा विचार करता, तेव्हा ते कॉर्टिसोलचे प्रमाण वाढवते आणि भावनिक नियमन बिघडवते.

दी इंडियन एक्स्प्रेसने मद्याच्या सेवनाचे झोपेवर होणारे दीर्घकालीन परिणाम समजून घेण्यासाठी आरोग्य तज्ज्ञांशी संवाद साधला. फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट गुरुग्राम येथील मुख्य क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट दीप्ती खतुजा (Deepti Khatuja) यांनी सांगितले की, मद्यपानचे सेवन एखाद्याच्या झोपेवर हानिकारक परिणाम करू शकते.

त्या सांगतात, “दीर्घकालीन मद्यापानामुळे न्यूरोट्रान्समीटरची क्रिया बदलते जसे की – सेरोटोनिन, नॉरपेनेफ्रिन, जीएबीए, ग्लूटामेट व नॉरएड्रेनालाईन – तसेच इतर झोपेच्या घटकांवर परिणाम होतो. हे बदल मद्यपींमध्ये आणि मद्यपान सोडणाऱ्या लोकांमध्ये दिसून येतात, ज्यामुळे झोपेमध्ये समस्या उद्भवतात.”

त्या पुढे सांगतात की, अभ्यासातून असे दिसून आले आहे की, मद्यपींमध्ये दिसून आलेल्या काही झोपेच्या समस्या सतत मद्यपान करणे टाळल्यानंतरही कायम राहू शकतात आणि त्यामागील कारणे खालीलप्रमाणे असू शकतात.

काही झोपेच्या समस्या मद्यपान करण्यापूर्वी उद्भवू शकतात आणि त्यामुळे त्या समस्या मद्यपान न केल्यानंतरही तशाच राहू शकतात.

दीर्घकालीन मद्यपान झोपेचे नियमन करणाऱ्या मेंदूच्या प्रणालींना हळूहळू नुकसान पोहोचवू शकते.

दीर्घकालीन मद्यपान हे झोपेमध्ये व्यत्यय आणणाऱ्या वैद्यकीय व मानसिक आजारांशी संबंधित असू शकते, जे झोपेमध्ये व्यत्यय आणते.

मखिजा याला ‘फेक स्लीप’ (Fake Sleep) का म्हणतात?

अनेकांना असे वाटते की, मद्यपानाने चांगली झोप येते. कोलकाताच्या सॉल्ट लेक येथील मणिपाल हॉस्पिटल्सच्या सल्लागार (इंटर्नल मेडिसिन) व इंटेन्सिव्हिस्ट डॉ. अर्पण चौधरी यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, मद्यपानामुळे झोपेची गुणवत्ता आणि एखाद्या व्यक्तीच्या झोपेतील स्वप्नाचे प्रमाण बिघडते, असे समोर आले आहे. याचा परिणाम स्मरणशक्ती आणि एकाग्रतेवर झाल्याचे दिसू शकते. मद्यपानामुळे स्लीप अॅप्नियासुद्धा वाढू शकतो.

याबाबत डॉ. अर्पण चौधरी, “जेव्हा झोपण्यापूर्वी तुम्ही मद्यपान करता तेव्हा रक्तात त्याचे प्रमाण जास्त राहते आणि त्यामुळे लगेच झोप येते. पण, जेव्हा यकृत मद्यपानाचे चयापचय करण्यास सुरुवात करते तेव्हा मात्र झोपेमध्ये व्यत्यय येतो. झोपण्यापूर्वी मद्यपान केल्यामुळे एकदा झोपल्यानंतर लगेच जागे होण्याची शक्यता जास्त असते. यालाच ‘फेक स्लीप’ “, असे म्हणतात.

“झोपेचा कालावधी कमी होणे आणि झोपेमध्ये जास्त व्यत्यय येणे हे या असंतुलनाचे परिणाम असू शकतात, ज्यामुळे झोपेची एकूण गुणवत्ता कमी होते. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅप्निया (OSA) सुद्धा दिवसा झोप आणि थकवा येण्यास कारणीभूत ठरतो. लोक दिवसा जागे राहण्यासाठी कॉफीसारख्या कॅफिनयुक्त पदार्थांचा वापर करतात, ज्यामुळे अस्वस्थता वाढते.” असे ते पुढे सांगतात.