How To Pack Food For Better Health: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) यांनी अन्न विक्रेते आणि ग्राहकांना “खाद्य पदार्थ साठवण्यासाठी, डिलिव्हरी करण्यासाठी किंवा पॅकिंग करण्यासाठी वर्तमानपत्रे वापरणे त्वरित थांबवावे” असे आवाहन केले आहे. FSSAI च्या सीईओ जी कमला वर्धन राव यांनी सांगितले की, “वृत्तपत्रांमध्ये वापरल्या जाणार्या शाईमध्ये असणारे केमिकल हे बायोएक्टिव्ह असल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतात यामुळे मुख्यतः पोटाशी संबंधित विकार होऊ शकतात शिवाय याचा आरोग्यावर दूरगामी वाईट परिणाम होऊ शकतो.”
FSSAI च्या निर्देशात नमूद केले आहे की प्रिंटिंग शाईमध्ये रसायने असू शकतात, ज्यामध्ये शिसे आणि जड धातूंचा समावेश असू शकतो. या कागदात अन्नामध्ये बांधून ठेवल्याने ही रसायने अन्नामध्ये लीक होऊ शकते ज्यामुळे कालांतराने आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. FSSAI ने सांगितले की, प्रिंटिंगनंतर कागदाच्या तुकड्यांना विविध पर्यावरणीय परिस्थितींचा सामना करावा लागतो, ज्यामुळे ते जीवाणू, विषाणू यांच्या संपर्कात येतात. हेच विषाणू अन्नात जाऊन पुढे यातून आजार होऊ शकतात.
याविषयी क्लिनिकल आहारतज्ञ गरिमा गोयल यांनी इंडियन एक्सप्रेसला माहिती देताना सांगितले की, “वृत्तपत्रात अन्न साठवून ठेवण्याच्या सवयीमुळे पाचन समस्या उद्भवू शकतात आणि विषबाधा देखील होऊ शकते. जरीही तुम्ही अशा पद्धतीच्या पदार्थांचे कमी प्रमाणात सेवन केले तरी या पदार्थांमुळे पोटाचे किरकोळ त्रास होऊ शकतात. पण जर तुम्ही वारंवार अशाच प्रकारचे पदार्थ खात असाल तर विषबाधा होऊ शकते आणि भविष्यात कर्करोगाचा धोका वाढू शकतो. विशेषतः वृद्ध व लहान मुलांना तर अशाप्रकारे खायला देऊच नये कारण या वयात रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने आजार बळावण्याची भीती जास्त असते.”
इंडियन एक्सप्रेसने डॉ. श्रीकांत के पी, सल्लागार, बालरोग गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि हेपॅटोलॉजी, मणिपाल हॉस्पिटल यांच्याकडून याबाबत सल्ला घेतला असता, त्यांनी सांगितले की, “वृत्तपत्रातील शाईमुळे अन्नामध्ये रसायने मिसळतात, पण त्याचा प्रभाव कदाचित तुम्हाला लगेचच जाणवू शकणार नाही. पण दीर्घकालीन परिणाम अत्यंत वाईट असू शकतो. याला पर्याय म्हणून काहीजण प्लॅस्टिकच्या डब्यात अन्न साठवून ठेवतात पण काही वेळा तुम्ही जेव्हा गरम किंवा कमी कोमट अन्न ठेवता त्यामुळे प्लॅस्टिक वितळू शकते आणि त्यातील रसायने अन्नात मिसळू शकतात.”
हे ही वाचा<< Weight Loss: जंपिंग जॅक ठरेल वजन कमी करायची सोपी हॅक! डॉ. मेहतांकडून जाणून घ्या फायदे व प्रभावी पद्धत
आतापर्यंत आपण समस्या व त्रास जाणून घेतला पण आता त्यावर पर्याय काय हे सुद्धा पाहूया .
- सूप आणि द्रव स्वरूपातील खाद्यपदार्थांसाठी जाड प्लॅस्टिक वापरता येईल पण त्यासाठी आधी गरम पाण्याने कंटेनरचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे.
- थंड पदार्थ ‘फ्रीझर जेल पॅक’ किंवा आईस बॉक्समध्ये ठेवा त्यासाठी स्टीलची भांडी वापरता येऊ शकतात
- एरवी सुद्धा स्टेनलेस स्टील, हळद, केळीची पाने किंवा काचेची जाड भांडी वापरता येऊ शकतात.
- ताजी फळे आणि भाज्या खाण्यापूर्वी आणि डब्यात पॅक करण्यापूर्वी नेहमी वाहत्या पाण्याखाली स्वच्छ धुवावी
- कागद, प्लास्टिक पिशव्या, खाद्यपदार्थांचे आवरण आणि अॅल्युमिनियम फॉइल यांसारखे पॅकेजिंग साहित्य केवळ एकदाच वापरावे, पुनर्वापर टाळावा.